
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभाग विविध कारणांनी नेहमी चर्चेत असतो. जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय असे महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. परंतु या रुग्णालयातील पदांना सध्या मोठ्या प्रमाणात ग्रहण लागले असून रेडिओलॉजिस्ट नसल्याच्या कारणांनी जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. तर याचाच फटका आता या रुग्णालयात येणाऱ्या महिलांना बसत आहे.
गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेला जिल्हा त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांच्या बरोबर मध्य प्रदेश छत्तीसगड येथील अनेक रुग्ण उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयाचा आसरा घेतात. मात्र, शासकीय रुग्णालयातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय हे एकमेव महिला रुग्णालय असून या रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याचा फटका मोठ्या प्रमाणात स्त्री रुग्णांना बसत असल्याचे दिसून येत आहे. याविषयी शासकीय महाविद्यालयाचे डीन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या एकच रेडिओलॉजिस्ट डॉक्टर असल्यामुळे सध्या केटीएस रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सुरू आहे. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्य व या रुग्णालयात येणाऱ्या स्त्री रुग्णांना बाहेर पैसे मोजून सोनोग्राफी करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर याविषयी शासनाकडे मागणी केली आहे. पण अजून पर्यंत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. आता याचाच फटका सर्वसामान्य महिला रुग्णांना बसत आहे.