सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेवर जाणार

0

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक होणार आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींना यंदा राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्या 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजस्थानमधून राज्यसभेवर गेले होते. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे, त्यामुळे त्यांच्या जागी सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी उद्या, बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेदेखील उपस्थित राहतील.

देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. याबाबतची अधिसूचना 29 जानेवारी रोजी जारी करण्यात आली होती. या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या 56 पैकी 10 जागा काँग्रेसला मिळणार हे निश्चित आहे. यामध्ये राजस्थानची एक जागाही येते. याच जागेवरुन सोनिया गांधी राज्यसभेवर जातील. उत्तरप्रदेशच्या अमेठीमधून 1999 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून काँग्रेस अध्यक्ष म्हणून संसदीय राजकारणाला सुरुवात करणाऱ्या सोनिया गांधी 2004 पासून सातत्याने रायबरेलीच्या खासदार आहेत. परंतु, यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे. सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत नसतील तर प्रियंका वाड्रा यांना रायबरेलीमधून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

क्रिस्पी थ्रेडेड पनीर टिक्का | Shankhnaad News #shankhnaadnews #live