ज्येष्ठांच्या समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन

0

जेष्ठ नागरिक संघटना संयुक्त समन्वय समितीचा निर्णायक इशारा

एक महिन्‍याच्‍या आत ज्‍येष्‍ठ नागरिकांच्या समस्‍या सोडवा अन्‍यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ज्‍येष्‍ठ नागरिक संघटना संयुक्‍त समन्‍वय समितीने दिला आहे.
नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाकरीता झटणा-या विविध संस्था, मंडळे व संघटनांनी एकत्र येऊन “ज्येष्ठ नागरिक संघटनांची संयुक्त समन्वय समिती ”
प्रा. प्रभुजी देशपांडे यांच्या अध्यक्षतेत लोकांची शाळा येथे पार पडलेल्या सभेत स्थापन करण्‍यात आली. त्यामध्ये ज्‍येष्‍ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्‍यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, सचिव अॅड. अविनाश तेलंग, फेस्कॉम पूर्व विदर्भचे अध्यक्ष वसंत कळंबे, सचिव जितेंद्र भोयर, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे सचिव सुरेश रेवतकर यांचा समावेश आहे.
सर्व संघटनांनी एकत्र येऊन ज्येष्ठांच्या मागण्यानकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात यावे , या उद्देशाने संयुक्‍त समन्‍वय सम‍ितीची स्‍थापना करण्‍यात आल्‍याचे ज्येष्ठ नागरिक संघटनाच्या संयुक्त समन्वय समिती, नागपूरचे संयोजक अॅड. अविनाश तेलंग यांनी प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले आहे.
संयुक्‍त समन्‍वय समितीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना प्रलंबित मागण्‍यांचे निवेदन सादर केले असून केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, तसेच पालकमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांकडे ज्‍येष्‍ठांच्‍या मागण्‍यांसंदर्भात पाठपुरावा करण्‍यात यावा, अशी विनंती केली आहे. पालकमंत्री व उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यातून एकदा ज्येष्ठांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्‍याकरिता सभेचे आयोजन करावे, अशी मागणी संयुक्‍त समन्वय समितीने केली आहे. बैठकीला दादा झोड, प्रकाश पाठक, डॉ. दिपक शेंडेकर, हुकुमचंद मिश्रीकोटकर, उल्हास शिंदे, ईश्वर वानकर आणि प्रकाश मिरकुटे यांची उपस्थिती होती.