“सेवेतून समाजनिर्मिती” — कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आगळावेगळा उपक्रम

0

चंद्रपूर (दि. 12 ऑक्टोबर 2025):डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, चंद्रपूर यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने एक आगळावेगळा आणि समाजाला दिशा देणारा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात चंद्रपूर शहरातील विविध सेवा संस्थांना एकत्र आणून समाजासाठी होत असलेल्या सेवाकार्याचे दर्शन घडविण्यात आले.
सेवा समितीचे मत असे की — “चंद्रपूरातील सर्व सेवा संस्था, संघटना व स्वयंसेवी गट हे एका परिवाराचे घटक आहेत. समाजसेवेचा एकच उद्देश — ‘समाजाचे कल्याण’ — या सर्वांच्या कार्यातून प्रकट होतो. या सर्व संस्थांना एकत्र आणून समाजासमोर त्यांचे कार्य सादर करण्यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आला.”
या कार्यक्रमाला माननीय उपजिल्हाधिकारी श्री. संजय पवार व निवासी उपजिल्हाधिकारी श्री.डी.एस. कुंभार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मंचावर सेवा समितीचे मार्गदर्शक श्री. वसंत थोटे,आश्रय छात्रावास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सी. ए.दामोदर सारडा,आश्रय छात्रावास व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. शैलेश बागला,सेवा समितीचे सचिव ऍड. आशिष धर्मपुरीवार, कोषाध्यक्ष संदीप बच्चुवार उपस्थित होते.

कार्यक्रमात शहरातील ज्ञान अर्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था, जनजाती विकास समिती गडचिरोली, वनवासी कल्याण आश्रम, मातोश्री वृद्धाश्रम, मैत्रेय छात्रावास, डेबू सावली वृद्धाश्रम, साई सेवा प्रतिष्ठान, रोल संस्था,गडचिरोली, संस्कार भारती चंद्रपूर, भारतीय शिक्षण मंडळ अशा विविध संस्थांनी सहभाग घेतला. प्रत्येक संस्थेने आपले चालू सेवा कार्य जनतेसमोर मांडत आनंद व्यक्त केला की, “अशा प्रकारचा सर्वसमावेशक कार्यक्रम आजवर कोणी आयोजित केलेला नाही,” असे सांगत त्यांनी सेवा समितीचे विशेष आभार मानले.
माननीय उपजिल्हाधिकारी श्री. संजय पवार यांनी आपल्या मनोगता मध्ये सेवा समितीच्या कार्याचे मनापासून कौतुक करताना सांगितले —
“कोजागिरी पौर्णिमेचा सण आपण सहसा आनंदाने साजरा करतो, पण समाजसेवेचा आनंद यातून अनुभवण्याची संधी देणारा हा कार्यक्रम खरंच दिशा देणारा आहे. सेवाकार्य हे तन, मन आणि धनाने करावे. समाजात दातृत्व आहे; फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे.”
निवासी उपजिल्हाधिकारी श्री डी.एस. कुंभार यांनीही आपल्या प्रेरणादायी मनोगता मध्ये सांगितले की —
“ध्येय निश्चित केल्याशिवाय यश मिळत नाही. प्रत्येक संस्थेने आपल्या सेवाकार्यातून अशी ओळख निर्माण करावी की समाज स्वतःहून मदतीसाठी तुमच्याकडे यावा. समाजाला केवळ अपेक्षा आहे की,तुमच्या हातून मिळणारी मदत ही सत्कर्मासाठी वापरली जावी.”
या प्रसंगी शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती तसेच आश्रय छात्रावासातील विद्यार्थी उपस्थित होते. छात्रावास विद्यार्थी प्रणय यांनी कोजागिरी पौर्णिमेचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व सुंदर शब्दांत विशद केले.
ऍड.आशिष धर्मपुरीवार आपल्या प्रास्ताविकेतून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला,तो म्हणजे सेवा हीच साधना आणि साधनेतूनच समाजाचा उत्थान.एकत्रित प्रयत्नातून समाजाला दिशा हेच या उपक्रमाचे सार.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ऍड. आशिष धर्मपुरीवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. संदीप देशपांडे, डॉ. सुजित डाकूआ, श्री.मुकुंद पाठक, ज्योती रामटेके, आणि श्रीकांत सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.