राज्यातील सामाजिक ऐक्याची वीण महत्वाची

0

 

– संजीव भोर (Sanjeev Bhor)

(Nagpur)नागपूर -कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतील मात्र कायदेशीर बाजूनेच सरकार पुढे जाईल. यात कोणाच्याही डेडलाईनची चिंता करणार नाही. राज्यातील सामाजिक ऐक्याची वीण अबाधित राहणे महत्त्वाचे आहे हे मराठा व ओबीसी समाजातील नेत्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते, मराठा समाजाचे समन्वयक संजीव भोर यांनी स्पष्ट केले आहे. संजीव भोर ‘शंखनाद’शी बोलताना म्हणाले, आजवर लाखोंचे मोर्चे मराठा समाजाचे राज्यात निघाले मात्र आज दिसत आहे तसा संघर्ष कधी दिसलाच नाही. मराठा आरक्षण जिव्हाळ्याचा विषय असला तरी घटनेच्या चौकटीत टिकणारे आरक्षण आम्हाला हवे आहे. गेली 20-22 वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे .आज मराठा -ओबीसी असा संघर्ष उभा ठाकलेला आहे. महाराष्ट्राला निश्चितच हे चित्र भूषणावह नाही. हातपाय तोडण्याची भाषा या पुरोगामी महाराष्ट्रात कधीही पाहिलेली नाही. हे व्हायला नको इतक्या बेजबाबदारपणे कोणी बोलायला नको, महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याची वीण जपली पाहिजे.खरंतर मराठा नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली. 11 कोटी 44 लाख जुनी कागदपत्रे तपासली गेली.कुणबी म्हणून नोंदी असल्या तर खत्री आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार 1 जून 2004 रोजी कायदा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळातच हा कायदा झाला.त्यामुळे ज्याच्या नोंदी आढळतील त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले. मात्र ती देण्यास आजवरचा काळ लोटला.

अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोसपणे हा निर्णय जाहीर केला.आता समिती रद्द करा ही मागणी करणे चुकीचे आहे मग ती मागणी कोणीही करू देत असेही भोर यावेळी आवर्जून म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले त्यानुसार ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री असताना त्यांनी वास्तविकता समजून घ्यावी, उगीचच आकांडतांडव करीत दोन समाजात दरी निर्माण करण्याचे काम होऊ नये, जरांगे पाटलांचा निस्वार्थपणा मराठा समाजाला भावला, त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी एकवटला पण त्यांनी तसेच ओबीसी नेत्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. कुणाच्याही भावना दुखावणार नाही,दोन समाज परस्परांपुढे उभे ठाकणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे यावर भोर यांनी भर दिला.