सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रश्मी सोवनी यांचे निधन

0

नागपूर: सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रश्मी अरविंद सोवनी यांचे काल रात्री आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार आज सकाळी 11 वाजता मानेवाडा घाट, नागपूर येथे करण्यात आले.

गडचिरोलीच्या दुर्गम भागापासून नागपूर शहरापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. पुरोगामी विचारसरणीच्या डॉ. रश्मी सोवनी या केवळ प्राध्यापिका नव्हत्या तर सामाजिक आंदोलनांमध्ये जमिनीवर लढणाऱ्या एक सशक्त व्यक्तिमत्त्व होत्या. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी आपल्या लेखन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून चेतना निर्माण केली.

डॉ. सोवनी यांची समाजातील विविध समस्यांवर स्पष्ट व ठोस मते मांडण्याची शैली प्रख्यात होती. टीव्ही चर्चासत्रांमध्ये त्यांच्या परखड बोलण्यामुळे त्या विशेष ओळखल्या जात होत्या. स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि योगदान हे समाजासाठी एक महत्त्वाचा वारसा आहे.

त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा आवाज कायमचा हरपला आहे. त्यांच्या जाण्याने समाजाला मोठी हानी झाली आहे.