स्फोटके बनविणाऱ्या कंपनीतील स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू

0

शासकीय पातळीवरील मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर
– निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे

नागपूर(Nagpur) १३ जून :- रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास अमरावती रोडवरील नागपूरपासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा तालुक्यातील मौजा तुरा गुंदी येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या स्फोटके बनविणाऱ्या कंपनीमधील गन पावडर अँड सेफ्टी फ्युज सेक्शन(and safety fuse section) मध्ये स्फोट झाल्यामुळे पाच महिला आणि एक पुरुष अशा एकूण सहा व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

आज दिनांक १५ जून रोजी आणखीन दोन व्यक्तींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी दिली.या स्फोटामध्ये जखमी असलेले दानसा मरसकोल्हे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सदर व्यक्ती हे मूळचे मध्य प्रदेश येथील असून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्त करून मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आलेला आहे. तसेच सदर व्यक्तीच्या वारसांना कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने रुपये 25 लाख इतक्या रकमेचा धनादेश देण्यात आलेला आहे.धामणा गावातील दुर्घटनेत जखमी झालेल्या श्रद्धा पाटील यांचे दंदे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी आकाश औताडे, हिंगणा तहसीलदार सचिन कुमावत, नागपूर ग्रामीण तहसीलदार टेळे यांनी या दुर्घटनेतील मृतक परिवारांच्या मदतीसाठी हॉस्पिटल, कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. पोस्टमार्टम करिता मृतदेह जीएमसीला हलविण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कंपनीतर्फे 25 लाखाचा धनादेश दिला जात असल्याचे सांगितले आहे.

प्रमोद चवारे वय २५ वर्ष रा. नेरी मानकर तालुका हिंगणा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या स्फोटात प्रांजली मोदरे, वय 22 वर्ष रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, प्राची फलके वय २० वर्षे रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, वैशाली क्षीरसागर वय २०वर्ष रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, मोनाली अलोने वय 27 वर्ष रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, पन्नालाल बंदेवार वय ५० वर्ष रा. सातनवरी तालुका नागपूर ग्रामीण, शीतल चरप वय ३० वर्ष रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण यांचा मृत्यू झाला.