अपघातात सहा जणांचा मृत्यू; एसटी बसचा भीषण अपघात

0

मुंबई-आग्रा महामार्गावरील राऊड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चांदवड जवळच्या राऊड घाटात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी रवाना झाले. भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

———–
रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी
ठाकरे गटाला रामराम करताच गळ्यात उमेदवारीची माळ

उत्तर पश्चिम मुंबईतून अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खास मोहऱ्याला रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर वायकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आज अखेर पक्षाकडून यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
———–
एक दिवसाच्या बाळाची हत्या; वडीलांना आजीवन कारावास
अजनी पोलिस स्टेशन अंतर्गतची घडली होती घटना

एक दिवसाच्या बाळाच्या हत्या प्रकरणात विद्यमान जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख वडीलांना आजीवन कारावासाची शिक्षा ठाेठावली. सरकार विरुध्द गिरीष गोंडाणे या खटल्यात आरोपीला ही शिक्षा ठोठावण्यात आली. ही घटना ३१ डिसेंबर २०२२ रोजी अजनी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली होती. त्याचा निकाल देताना कोर्टाने आरोपी वडीलांना आजीवन कारावास शिक्षा सुनावली आहे.

काँग्रेसचा पंजा महाराष्ट्र पोलिसांच्या बोधचिन्हातही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणूक आयोगात तक्रार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या बोधचिन्हावर आक्षेप घेतला आहे. या बोधचिन्हा मध्ये असलेला पंजा हे चिन्ह बदलावे किंवा काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह बदलावे अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर निर्णय झाल्यास चिन्हांच्या संदर्भात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील अशोक तावरे यांनी दिला आहे.

नीरव मोदी याची संपत्ती अमरावती जिल्ह्यात
नीरव मोदीचे अमरावती कनेक्शन
१४ हजार कोटींचा बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी याची संपत्ती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने २५०० चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी २ एप्रिल २०२४ रोजी नोटीस जारी केली आहे. त्यामुळे नीरव मोदीचे अमरावती कनेक्शन शोधून काढणे सरकारपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.


खडसे कुटुंबीयांबाबत 137 कोटी रुपयांचे अवैध उत्खनन प्रकरण

खडसे कुटुंबीयांबाबत 137 कोटी रुपयांच्या अवैध उत्खनन प्रकरणाची आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नेमकं या प्रकरणावर काय सुनावणी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दौऱ्यावर
भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांची प्रचारसभा
बेळगाव- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खानापूर मध्ये जाहीर सभा होणार आहे. कारभार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. मलप्रभा मैदानावर संध्याकाळी चार वाजता ही सभा होणार आहे.

2 मे रोजी नाशिक महायुतीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज
नाशिकचा उमेदवार कोण असणार

नाशिक- 2 मे रोजी नाशिक महायुतीचे उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दिंडोरी भाजपाचे उमेदवार भारती पवार आणि नाशिकचा उमेदवार एकत्रिक अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकत्रिक अर्ज भरण्यात येणार असल्याने उद्याच महायुतीला नाशिकचे उमेदवार जाहीर करावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पुढील 24 तासांत तापमान वाढणार
मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता कायम

राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका चंगलाच वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 3 मेपासून तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

लहरी हवामानाचा रानमेव्याला फटका
उत्पादनावर मोठा परिणाम

सध्याच्या लहरी हवामानामुळे नैसर्गिक रानमेवा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. हापूस आंबा स्वस्त. उन्हाळा म्हटलं की, रानमेवा चाखण्याची आस लागलेली असते. मात्र यंदा एप्रिल महिना संपत आला, तरी नागरिकांना रानमेव्याची प्रतीक्षा आहे. डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असणारी करवंद, रसदार जाबळे, आंबट गोड चिंचा, कैऱ्या अशा प्रकारचा रानमेवा या काळात मिळतो. मात्र यंदाच्या लहरी हवामानामुळे या सर्व रानमेव्याला फटका बसला आहे