
अमरावती AMRAWATI 6 जानेवारी : पतंगोत्सवाकरिता MAKARSANKRANTI 2024 नायलॉन मांजाची विक्री व वापर यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आगामी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर कारवाई सत्र राबविण्यात येत आहे. त्यामुळे आपले पाल्य पतंग उडविण्याकरिता नायलॉन किंवा प्रतिबंधित मांजाचा वापर करीत असेल तर पालकांनी त्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर करणार्या व्यक्तींविरुद्ध सहा महिन्यांपर्यंत शिक्षेसह कमीत कमी 10 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच नायलॉन मांजाची निर्मिती व विक्रीकरिता वाहतूक करणार्या व्यक्तीविरुद्ध 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षेसह किमान एक लाख रुपयेदंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कृत्रिम किंवा बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य कोणताही तीक्ष्ण पदार्थ यांनी अवगुठित केलेला असा कोणताही धागा, यांची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा आणि वापर प्रतिबंध करण्यात आले आहेत. याकरिता उपाययोजना म्हणून कारवाई करण्याकरिता साहाय्यक क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणात झोननिहाय ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरिक्षक यांचे पथक यापूर्वीच गठित करण्यात आले ’आहे. या पथकामध्ये महसूल व पोलीस विभागाच्या अधिकार्यांचाही समावेश आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना आवश्यक
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंग व मांजा विक्री करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना अनिवार्य आहे. मंडळाची संमती नसल्यास संबंधित आस्थापनांना तत्काळ सील करण्यासंदर्भातील कारवाई करण्यात येणार आहे.