रौप्य महोत्सव : २५ वर्षांनी शाळेतील आठवणींना उजाळा

0

चंद्रपूर(Chandrapur):छोटुभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथील १९९९ मधील १० व्या वर्ग मधील माजी विद्यार्थ्यांनी २६ मे रोजी “दिवस शाळेचे… क्षण रौप्य महोत्सवाचे” हा कार्यक्रम आयोजित करून शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील सुवर्ण दिवस आणि आठवणींना पुन्हा जिवंत करणे हा होता. माजी विद्यार्थ्यांनी शाळेत भेट देऊन आपल्या जुन्या वर्गात जाऊन त्यांच्या जीवनातील निर्णायक टप्पे आणि क्षणांना स्मरण केले.

शाळेत आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी भावूक झाला होता. अनेकांचे डोळे पाणावले कारण त्यांना शाळेतील आठवणींनी भारावून गेले होते.

सकाळी ११ वाजता चंद्रपूरमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येकजणाने आपला परिचय दिला. काही उच्चपदावर पोहोचले होते तर काहींनी छोटासा व्यवसाय सुरू केला होता. क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येकाचे चेहरे आनंदाने उजळले होते.

यानंतर धीरज साळुंके यांनी शाळेला उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखवले. या पत्रातून त्यांनी शाळेतील दिवसांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. या पत्रावर अनेकांनी कौतुकाची दाद दिली.

नंतर संगीत खुर्ची आणि निंबू चमचा यांसारख्या खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दुपारी जेवणाचा कार्यक्रम झाला.

दुपारी ४ वाजता शिक्षक कार्यक्रमात दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यात परिहार मॅडम, वैद्य मॅडम, कुंभरे मॅडम, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक जवादे सर, ढेंगळे सर, गर्गेलवार सर, शर्मा सर, मानकर सर, निबांळकर सर, आबोजवार सर आणि बारापात्रे सर यांनी मार्गदर्शन केले.

धीरज साळुंके यांनी पठाण सरांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या पत्राद्वारे उपस्थितांना भावुक केले. या कार्यक्रमात दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ कमी असतो. पैसा मिळवणं महत्वाचं आहे, पण आनंद विकत घेता येत नाही. असे कार्यक्रम आयोजित करून आनंद मिळवणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया प्रत्येकाने व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी अभिषेक आचार्य, चंद्रकांत कोतपल्लीवार, जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, पराग जवळे, श्याम कोंतमवार, वर्षा सेलोटे, सागर कुंदोजवार, कृणाल पद्मगिरीवार आणि अजय फुलझेले यांनी विशेष परिश्रम घेतले होते..