

नागपूर(Nagpur) : ‘पंचमदा’ नावाने लोकप्रिय असलेले संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या 86 व्या जन्मदिनानिमित्त ‘हिट्स ऑफ आर.डी. बर्मन’ या संगीतमय कार्यक्रमातून श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीतर्फे स्वरसुमनांजली वाहण्यात आली.
सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अतिथी गायिका निकेता जोशी यांच्यासह समीर पंडीत, दत्तात्रय वझरकर, निरजा धांडे, अनिल नायर, सुवर्णा पंत, आशिष पाटील, समीक्षा चरडे, धीरज पारपल्लीवार, हर्षवर्धन वैरागरे, मोहिनी देशपांडे, शशीकांत वाघमारे, श्वेता देशमुख बोरकर, अनघा वैद्य, अंजली खोडवे, स्मिता व्यास आदींनी एकाहून एक सरस गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरवात समीर पंडित यांच्या “फिर वही शाम हैं” या गाण्याने झाली. त्यानंतर आशिष पाटील यांनी “किसका रस्ता देखे”, अतिथी गायिका निकेता जोशी यांनी “निशा”, दत्तात्रय वझरकर यांनी “बडे अच्छे लगते हैं”, निरजा धांडे यांच्या “प्यार करने वाले”, या गीतांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला.
इतर गायकांनी ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता हैं, एक अजनबी हासिना से, दो लफ्जो की हैं, प्यार हुवा चूपके से, ये लडका हाय अल्ला, ओ हंसीनि, क्या हुआ तेरा वादा आदी गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. गायक कलाकारांना परिमल जोशी, ऋग्वेद पांडे, पंकज यादव, महिंद्र वातुलकर, राजू गजभिये, रितेश त्रिवेदी या वाद्य कलाकारांनी उत्तमरीत्या साथ दिली. कार्यक्रमाची संकल्पना समीर पंडित यांची होती. कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध निवेदिका विशाखा पवार यांनी केले. कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ नागपूर हेरिटेजचे सहकार्य लाभले.