गुरुमंदिरात श्री दत्तजयंत्युत्सवाला प्रारंभ

0
मोहनबुवा रामदासी यांचे गुरुमंदिरात श्री दत्तजयंत्युत्सवाला प्रारंभ
मोहनबुवा रामदासी यांचे गुरुमंदिरात श्री दत्तजयंत्युत्सवाला प्रारंभ
 परमार्थ हा स्वतः जीवन जगण्याचा मार्ग आहे. परंतु भक्तिमार्ग, कर्ममार्ग उपासनेच्या दिशेनेच घेऊन जाणारा मार्ग असतो, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र खातगाव येथील समर्थ मठाचे संस्थापक मोहनबुवा रामदासी यांनी येथे केले. समर्थ सद्गुरू श्री विष्णुदासस्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र, गुरुमंदिर जयप्रकाशनगर येथे दत्‍तजयंती निमित्‍त आयोजित श्री दत्तजयंत्युत्सव सोहळ्याला शनिवारी प्रारंभ झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला प्रारंभ झाला. सायंकालीन सत्रात ‘ दैनदिन जीवनात दासबोध ‘ या विषयावर मोहनबुवा रामदासी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. मोहनबुवा म्हणाले, जिथे शब्दांची मर्यादा संपते, शब्द कुंठित होतात तिथे अंत:करणाचा प्रांत सुरू होतो. मनात सतत द्वंद सुरू असते, उपासनेला बसताना अंतर्मनाला सद्गुरूंच्या स्वाधीन करावे आणि बाह्य मन नियंत्रणात ठेवावे. मनाच्या जुन्या संस्कारातून बाहेर पडण्यासाठी दासबोध वाचावे. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत कळत नाही.
केवळ पारायण, पुजनातूनाच नव्हे तर श्रवणातूनही मानसपूजा करावी. भीतीपोटी परमार्थ करू नये. आत्मानंद, आत्मोद्धारासाठी परमार्थ करावा. दासबोधातील समर्थ प्रत्यक्ष दर्शन देतात. दासबोध हे समर्थांचे स्वरूप आहे, त्यातील प्रत्येक ओळींतून मनातल्या प्रश्नांचे उत्तर मिळते. आपली आवड न पाहता सद्गुरूंच्या आवडीचे कर्म करावे. मनातली इच्छा निर्मूलनाचे कार्य गुरू करतात. म्हणून ध्यानाचा नैवैद्य दाखवावा. दासबोध आचरणात आणण्यासाठी आधी कर्म करावे, त्याद्वारे उपासना , ज्ञान व मोक्षप्राप्ती निश्चितच होते. दासाने दासाला केलेला नेमका बोध जाणण्यासाठी दासबोध अंतरंगात आणायला हवा. संकल्प पूर्तीसाठी साधना नको, आपल्या इच्छा सदगुरूत विलीन करून , समर्थांच्या सांगण्याप्रमाणे गुरूसमोर उभे रहा व ते देतील ते स्वीकारा कारण आपले मागणे वेगळे असते, त्यांचे देणे निराळे. सद्गुरूंच्या नामस्मरणाने प्रपंचासाठी रडणाऱ्या व्यक्तीचा संसार पिकलेल्या फळासारखा अलगद गळून पडतो, असे मोहनबुवा रामदासी म्हणाले. दत्तजयंतीनिमित दररोज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित प्रवचन सत्राचा साधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र प्रमुख कल्याण पुराणिक यांनी केले आहे.

17:22