श्रद्धेय दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी वर्षाचा थाटात समारोप

0

नागपूर (Nagpur), 7 ऑगस्‍ट
श्रद्धेय दत्‍ताजी डिडोळकर (Dattaji Didolkar)यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त त्‍यांचे आपण स्‍मरण केले पण त्‍यांच्‍या गुणांचे, त्‍यांच्‍या कार्याचे अध्‍ययनदेखील केले गेले पाहिजे, असे मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्‍यक्‍त केले.

श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम बुधवारी रेशीमबाग येथील कवी सुरेश भट सभागृहात पार पडला. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat), अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज, अभाविप अखिल भारतीय संघटन मंत्री आशिष चव्‍हाण, आधारवडचे लेखक अरुण करमरकर, समितीचे सचिव अजय संचेती, संयोजक भुपेंद्र शहाणे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Mr. Nitin Gadkari)होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ च्‍या दुस-या आवृत्‍तीचे पुस्तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. अजय भालेराव यांनी अनुवादित केलेल्‍या ह‍िंदी आवृत्‍ती ‘द‍िपस्‍तंभ’ चे तसेच, स्‍मरणिकेचे प्रकाशन करण्‍यात आले.

डॉ. भागवत म्‍हणाले, दत्‍ताजींनी प्रतिकूल परिस्थितील अनुकूल बनवत कार्यकर्त्‍यांची फौज तयार केली. ते निश्‍चयाचा महामेरू होते. आपल्‍या दृढसंकल्‍पाने त्‍यांनी कार्यकर्त्‍यांच्‍या मनात श्रद्धा आणि विश्‍वास निर्माण केला. वर्षभर त्‍यांच्‍या आठवणींना आपण उजाळा दिला. पण आता त्‍या आधारे आपल्‍याला आपले जीवन घडवायचे आहे. आज दशा बदलली, समाजाची स्थिती बदलली पण त्‍यांनी दाखवलेली दिशा बदललेली नाही. त्‍यामुळे आता त्‍यांनी दाखवलेल्‍या दिशेने चालण्‍याचा संकल्‍प आपण केला पाहिजे, असे ते म्‍हणाले.

ज‍ितेंद्रनाथ महाराज यांनी दत्‍ताजींचा महापुरुष, ऋषितुल्‍य व्‍यक्तिमत्‍व असा उल्‍लेख केला. राष्‍ट्रनिर्माण, व्‍यक्‍तीनिर्माणासाठी त्‍यांनी तन-मन-धनाने कार्य केले, असे ते म्‍हणाले.आश‍िष चव्‍हाण यांनी दत्‍ताजी डिडोळकर यांच्‍या कार्यावर प्रकाश टाकला. त्‍यांचे विचार, कार्यपद्धती अभाविपच्‍या कार्यकत्‍यांसाठी प्रेरणादायी होती. ते दिशादर्शक, शक्‍तीदायी व्‍यक्‍ती होते, असे उद्गयार काढले.

भुपेंद्र शहाणे यांनी प्रास्‍ताविकातून जन्‍मशताब्‍दी वर्षात घेण्‍यात आलेल्‍या विविध उपक्रमांची माह‍िती दिली. अमर कुळकर्णी यांनी व्‍यक्तिगत गीत सादर केले. आभार पायल क‍िनाके यांनी मानले. सीमा सालोडकर यांनी वंदेमातरम सादर केले.
सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले. स्‍नेहल पाळधीकर यांनी सरस्‍वती वंदना सादर केली. या कार्यक्रमाला विदर्भातील नागरिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी समितीचे उपाध्यक्ष अरुण लखानी, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. बाळ दीक्षित, संयोजक भूपेन्द्र शहाणे, सहसंयोजक डॉ. रविशंकर मोर, सदस्य डॉ. विलास डांगरे, डॉ. रामदास आंबटकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. अनिल सोले, सुनील पाळधीकर, प्रा. नारायण मेहरे, डॉ. मुरलीधर चांदेकर, विनय माहुरकर, जयंत पाठक आदींचे सहकार्य लाभले.

श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्काराचे मानकरी

शिक्षण व समाजसेवा कार्यात उल्‍लेखनीय योगदान देणा-या संभाजी नगर येथील ओंकार विद्यालयाला श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. संजीव सावजी यांना 1 लाख रुपयाचा धनादेश डॉ. मोहनजी भागवत यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. सचिव हरीश जाखेटे यांची उपस्‍थ‍िती होती.

दत्‍ताजी कार्यकर्त्‍यांचा आधार होते – नितीन गडकरी

दत्‍ताजी डिडोळकर यांनी कार्यकर्त्‍यांवर निस्सिम प्रेम केले. त्‍यांनी गुणदोषांसकट कार्यकर्त्‍यांचा स्‍वीकार केला. त्‍यांनी आपल्‍या जीवनदृष्‍टीने कार्यकर्तांवर संस्‍कार करून व्‍यक्‍तीनिर्माणाचे काम केले. ते कार्यकर्त्‍यांचा आधार होते, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

दत्‍ताजी केवळ समर्पित, कर्मठ कार्यकर्ता नव्‍हते तर अजातशत्रू होते. विरोधकही त्‍यांचा सन्‍मान करायचे. ते उदारमतवादी होते, असामान्‍य गुणवत्तेची धनी होते, संघनिष्‍ठ होते. ते आयुष्‍यभर स्‍वयंसेवक राहिले, असे सांगताना नितीन गडकरी यांनी त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ झिरो माईल ते टेकडी रोड टनेलला त्‍यांचे नाव देण्‍याचे तसेच, नागपूर विद्यापीठातील दिक्षांत सभागृह व कन्‍व्‍हेंशन सेटर तयार करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत, अशी माहिती दिली. त्‍यांच्‍यावरील ‘आधारवड’ हे पुस्‍तक न नव्‍या पिढीला प्रेरणा देत राहील, असे ते म्‍हणाले.