

चंद्रपूर (Chandrapur)(सुसा) — लग्न म्हणजे दिखावा, डीजे आणि लाखोंचा खर्च… पण चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा गावातील श्रीकांत एकुडे याने या सगळ्याला फाटा देत एक वेगळीच आणि समाजहिताची वाट धरली. आपल्या सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या विवाहात श्रीकांतने अनाठायी खर्च न करता गावातील अतिशय अडचणीच्या असलेल्या दोन शिवार रस्त्यांचे खडीकरण केले. या सामाजिक भानातून उभ्या राहिलेल्या उपक्रमाने संपूर्ण परिसरात कौतुकाची लाट उसळली आहे.
विवाहाचा सामाजिक दृष्टिकोन
श्रीकांत एकुडे हे सुसा गावातील प्रगतशील शेतकरी असून, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतात. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मोझर गावच्या अंजली गरमडे यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. वधूपित्याने थोडा विचार करून या सादेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि “लग्नात फाजील खर्च नको, तोच पैसा उपयोगी कामासाठी वळवूया” असा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला.
गेल्या काही वर्षांपासून सुसा गावातील शिवार रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. पावसाळ्यात तर शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांनाही शिवारात पोहोचणे कठीण होत होते. श्रीकांतने लग्नाचा खर्च टाळून हा पैसा दोन महत्त्वाच्या शिवार रस्त्यांच्या खडीकरणासाठी वापरला. परिणामी, आता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
हरित आहेर, पर्यावरणपूरक विचार
विवाहसोहळ्यात नातेवाईकांना श्रीकांतने फुलांचे गुच्छ देण्याऐवजी फळझाडांची रोपे भेट देण्याचा आग्रह धरला. त्याला उदंड प्रतिसाद मिळत तब्बल ९० पेक्षा जास्त फळझाडांचे रोपटी नवविवाहित जोडप्याला भेट स्वरूपात मिळाले. या झाडांची लागवड करून आता एक सुंदर फळबाग उभी राहणार आहे.
नव्या युगाचा आदर्श विवाह
या विवाहाने सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. श्रीकांत एकुडे यांचे हे पाऊल संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे.
श्रीकांत एकुडे, नवरदेव म्हणाले —
“लग्न हा फक्त दोन व्यक्तींना जोडणारा नव्हे, तर दोन कुटुंब, दोन विचार जोडणारा सोहळा असतो. समाजासाठी काहीतरी उपयोगी करता आलं, तर लग्नाचा खरा अर्थ साकारतो.”