

सिंधुदुर्ग (Sindhudurg) :- सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आता यावर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीने रविवारी सरकारला जोडे मारो आंदोलन केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली आहे. ते नागपुरात बोलत होते. महाविकास आघाडीचे जे आंदोलन होत आहे, ते पूर्णपणे राजकारण आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी किंवा काँग्रेस कुणीही छत्रपती शिवरायांचा सन्मान केला नाही. पंडीत नेहरु, इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेली भाषणं आठवा. एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. पंडीत नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतला लुटले असे काँग्रेसनेच मुलांना अभ्यासक्रमातून शिकविले. याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष माफी मागणार का? असा सवाल फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.
मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटविला. तेव्हा काँग्रेसचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. कर्नाटकातही काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा काँग्रेस झोपली होती का? त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? असे फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. काँग्रेसने महापुरुषांबद्दल चुकीचा इतिहास शिकवला. त्यामुळे 50 वर्ष केलेल्या महापापाबद्दल काँग्रेसने माफी मागावी, असे फडणवीस म्हणाले.