शिरवाडकरांचे साहित्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग – प्रेमाताई खांडवे

0

वि. सा. संघातर्फे ‘स्मरण कुसुमाग्रजांचे’

नागपूर (Nagpur), 28 फेब्रुवारी
विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचे साहित्य गंगेप्रमाणेच भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांचे प्रगल्भ विचार त्यांच्या साहित्यातून कळतात. त्यांनी मराठी भाषेला उचित मान्यता मिळावी याकरिता प्रयत्न केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका प्रेमाताई खांडवे यांनी केले.

विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवासद्वारा शुक्रवारी कविवर्य वि. वा. शिरवाडकर जयंती आणि मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून ‘स्मरण कुसुमाग्रजांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक, कवी सुनील शिनखेडे, प्रमुख वक्ता म्हणून लेखिका प्रेमाताई खांडवे, पर्यावरणतज्ञ शेफाली दुधबडे उपस्थित होत्या.

प्रेमाताई खांडवे म्हणाल्या, ‘माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटी टिळा’ असं सांगणार्‍या कुसुमाग्रजांनी लक्षणीय लेखन केले. विशाखा या काव्यसंग्रहाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या काव्यसंग्रहातील कवितांनी राष्ट्रप्रेमाच्या ज्वाळा धगधगल्या. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ अशा राष्ट्रप्रेम जागृत करणार्‍या अनेक कविता आजही सर्वांच्या ओठांवर आहेत. कौंतेय, पेशवा, नटसम्राट अशी अनेक नाटके शिरवाडकरांची प्रसिद्ध आहे. ‘वीज म्हणाली धरतीला’ हे सांगीतिक नाटक अतिशय गाजल्याचे त्यांनी सांगितले.
शेफाली दुधबडे यांनी, विविध भाषांच्या मिश्रणात आपली अभिजात मराठी मागे पडते आहे. प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठीचा मनापासून स्वीकार करावा. शिरवाडकरांसारख्या मोठ्या साहित्यिकांचे साहित्य युवा पिढीपर्यंत कसे पोहोचेल याचा विचार करावा, असे सांगितले. त्‍यांनी पर्यावरणवर आपले विचार मांडले.

अध्यक्षीय समारोपात सुनील शिनखेडे यांनी, सावरकर आणि कुसुमाग्रज या दोघांनीही माय मराठीला खूप काही दिले आहे, असे सांगितले. आज अभिजात मराठीचा दर्जा मिळाला पण ती आधीही होती, आताही आहे. ज्ञानेश्वरी ही आपल्या मराठीचा मानदंड आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मराठी भाषेबद्दल संत तुकारामांनी जे लिहून ठेवले ते आवर्जून वाचायला हवे. भाषा आणि बोली यांचं जतन करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्याला मराठी साहित्याने भरभरून दिले आहे, असे ते म्हणाले.

यावेळी आयोजित कविता वाचनाच्या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी, शिरवाडकरांच्या स्वप्नाची समाप्ती, टिळकांच्या पुतळ्याजवळ आणि गर्जा जयजयकार, तर जयश्री अंबासकर यांनी, गाभारा, अहि नकुल आणि प्रेम कर भिल्लासारखं या कविता अतिशय उत्कृष्ट सादर केल्या. यानंतर प्रा विवेक अलोणी यांनी, झाड आणि मवाली, तसेच नदी या कविता सादर केल्या. ‘नटसम्राट’ या नाटकातील काही अंश अतिशय परिणामकारकरित्या वाचून विनय मोडक यांनी आपल्या नाट्याविष्काराने उपस्थितांना ‘गणपतराव बेलवलकर’ या भूमिकेच्या विश्वात नेले.
कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. मोनाली पोफरे यांनी केले. यावेळी वि. सा. संघाचे प्रकाश एदलाबादकर, माधुरी वाडीभस्मे आदी उपस्थित होते.