
नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Shivsena MLA Disqualification Case) निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी करण्यात आलीय. शिंदे यांना दोन महिन्यात त्यांचे म्हणणे सादर करायचे आहेत.
ठाकरे गटाने या निकालावर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा प्रश्न केला होता. त्यावर उच्च न्यायालयात अपिल केल्यास बराच कालावधी जाईल, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने अॅड कपिल सिब्ल यांनीकेला. राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचे नमूद केले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ३९ आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल. तारीख स्पष्ट नसली तरी फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.