पालघरमध्ये शिंदे-फडणवीसांचे “हम साथ साथ है..”

0

पालघर : “केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे..” या शिवसेनेच्या (शिंदे गट) जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात सुरु झालेल्या वादाला गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम (CM Shinde, DCM Devendra Fadnavis on Alliance ) दिला. “एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल, इतके हे सरकार तकलादू नाही. आम्ही 25 वर्षं एकत्र होतो. मात्र, या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट आहे..” असे सांगत फडणवीस यांनी वादावर पडदा टाकला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांचा उल्लेख ‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ असा केला. “फडणवीस आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. ये फेविकॉल का जोड है”, असे वक्तव्य करून शिंदे यांनी युतीमध्ये सारेकाही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. शिंदे म्हणाले की, “आम्ही कालही सोबत होतो. आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार.”
आज पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी वादाला पूर्णविराम दिला. मुंबईहून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे एकत्रच हेलिकॉप्टरने पालघरला आले. फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला.
“मागचे सरकार आपल्याला घरी बसलेले पाहायला मिळाले. मात्र आत्ताचे सरकार आपल्या दारी आहे. मागचे सरकार घरी बसले होते”, असा उल्लेखही फडणवीस यांनी केला.