शरद पवार यांचा घणाघाती प्रहार

0

 

(Ram temple)राम मंदिर उदघाटन हे भाजपचे व्यवसायी राजकारण

(Amravti)अमरावती दि. २७ : एन लोकसभा निवडुकांपूर्वी नियोजित राम मंदिर उदघाटन हे भाजपचे व्यवसायी राजकारण असल्याचा घणाघाती प्रहार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी अमरावतीत केला. मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण अद्याप मिळाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राम मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं आहे. मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. या मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे. माझी श्रद्धास्थानं आहेत तिथे मी जातो, पण त्याचं भांडवल मात्र करत नाही. मंदिरात जाणे ही प्रत्येकाची व्यतिगत बाब आहे. त्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नसल्याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला. शरद पवार हे बुधवार व गुरुवार अश्या दिवशीय अमरावती दौऱ्यावर आहेत.दरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधकांवर निशाणा साधला.

सत्ताधारी पक्षासमोर लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ठोस असं कारण नाही. त्यामुळे राम मंदिराचा विषय घेऊन जनतेमध्ये वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशी टीका शरद पवार यांनी केली. राम मंदिर उदघाटन पर्वावरच राहुल गांधी यांनी त्यांच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेची घोषणा का केली, या प्रश्नाचे उत्तर देतांना शरद पवार म्हणाले कि, इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांची प्रथम पदयात्रा पूर्ण झाली होती. त्यावेळीच त्यांना दुसरी पदयात्रा काढण्याच्या सूचना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केल्या होत्या त्यानुसार ते पुन्हा पदयात्रा सुरु करीत आहेत.

तीन राज्यात हरलो तरीही सोबतच लढू

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्याच्या निवडणूकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला असला तरीही पुढील सर्व निवडणूक आम्ही एकत्रित-सोबतच लढणार आहोत. आम्ही एकत्र काम केलं तर लोक आम्हाला पर्याय म्हणून स्वीकारतील. आज खऱ्या अर्थाने एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं याची आवश्यकता आहे. त्यासाठी आमची खबरदारी घेण्याची नीती आणि तयारी आहे. त्या तयारीला आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत आता आम्हाला पुढ्यातील निवडणुकांना एकत्र सामोरं जाणं गरजेचं आहे.असेही शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मल्लिकार्जून खऱगेंच्या प्रधानमंत्री पदाच्या उमेदवारिला विरोध केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. मी तिथेच उपस्थित होतो आमच्यापैकी कुणीही त्यांच्या नावाला विरोध केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा अध्यक्ष मी आहे, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष असे आम्ही तिघे एकत्र बसून जागावाटपाबाबतचा निर्णय घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

खासदार निलंबनावरूनही भाजपवर फटकारे

खासदारांच्या निलंबनाबाबत बोलताना शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर चांगलेच फटकारे ओढले. दोन जणं संसदेत घुसले, सभागृहात गोंधळ घालून त्यांनी धूराच्या नळकांड्या फोडल्या. ते संसदेत कसे घुसले याची माहिती सरकारने द्यावी ही मागणी केली म्हणून १४६ विरोधी सदस्यांना सभागृहातून निलंबीत केलं. त्यांची चूक काय होती याचे उत्तर आम्ही आजही सरकारला विचारत आहोत. सभागृह चालू असताना बाहेरची लोकं आत कशी घुसतात याची माहिती द्यायला भाजप सरकार तयार नाही. दरम्यानच्या अर्ध्या तासात सरकारने तीन बिलं मंजूर केली. त्याच्यावर साधी चर्चाही झाली नाही, सत्ताधारी पक्ष संसद कशा पद्धतीने चालवू पाहतेय हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण हे आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपवर फटकारे ओढले.

कडूंच्या चहाच्या आमंत्रणाचा बेअर्थ काढून नका

आमदार बच्चू कडू हे गुरुवारी शरद पवारांची भेट घेणार असल्याची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. मी अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे बच्चू कडू यांनी मला त्यांच्याकडे चहासाठी थांबा असं सांगितलं. त्यात काहीही राजकीय नाही, कडूंच्या चहाच्या आमंत्रणाचा बेअर्थ काढून नका असे शरद पवार म्हणाले. बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत. अशावेळी बच्चू कडू यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार का? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी सावधपणे टाळले.

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची इच्छा

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करुन घेणार का? या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हा माझ्या शेजारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे होते. खर्गेंच्या अध्यक्षतेखाली ती बैठक पार पडली. त्यांना मी स्वत: सुचवलं आहे की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्यासह निवडणुकीला सामोरं जाता येईल तर तो फैसला आवश्य करावा. त्यानंतर बैठक झाली की नाही ते मला माहिती नाही. पण महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन निवडणुकीला एकत्र सामोरं जावं, हि आम्हा सगळ्यांची इच्छा आहे असेही शरद पवार म्हणाले.

लोकसभेच्या अमरावती जागेसाठी कार्यकर्ते आग्रही

गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती. आता पुन्हा निवडणुकीस सामोरे जातांना लोकसभेची अमरावती हि जागा राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. कार्यकर्त्यांची मर्जी संभाळावीच लागणार आहे. परंतु अद्याप तसे काही ठरलेले नाही. वेळ येईल तेव्हा ठरवून योग्य निर्णय घेण्यात येईल असा सूचक संदेशही ते देण्यास विसरले नाहीत, हे उल्लेखनीय.