शेतकरी विषप्राशन प्रकरणाचे तीव्र पडसाद

0

 

यवतमाळ YAWATMAL  – नाला वळविण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले. वारंवार मागणी करून न्याय मिळत नसल्याने शेतकर्‍याने तहसीलदार परशराम भोसले यांच्या कक्षात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गौतम गेडे  Gautam Gede असे या शेतकर्‍याचे नाव असून, आर्र्णी तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहे. या प्रकरणी तहसीलदार भोसले यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावर आमदार डॉ. संदीप धुर्वे Dr. Sandeep Dhurve  यांनी संताप व्यक्त केला. अधिकार्‍यांनो शेतकर्‍यांशी सन्मानाने वागा, असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांची बाजू समजून घेतली असती तर, ही वेळ आली नसती. आता अधिकार्‍यांना पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आर्णीच्या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गौतम गेडे यांची बहिण श्‍वेता डेरे यांनी केली आहे. तहसीलदारांची बदली करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी दिला आहे. प्रशासकीय कामकाजाचा फटका जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बसत आहे. राज्य सरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. एकंदरीत विषप्रकरणावरून जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.