

नागपूर(Nagpur):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विद्यमान काळात डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील व्यवस्था विभागात कार्यरत शिरीष दत्तात्रेय वटे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे भाऊ किरण, बहीण मनीषा पांडे, जावई व मोठा आप्तपरिवार आहे. माधव नेत्रपेढीला त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
२८ ऑगस्ट १९६० रोजी शिरीष वटे यांचा जन्म झाला. प्रारंभी ते हनुमाननगर शाखेचे स्वयंसेवक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात झाले. त्यानंतर मोहता सायन्स कॉलेज व श्री बझाणी महाविद्यालयात त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण झाले.
शिक्षणानंतर १९८३ साली त्यांनी प्रचारक म्हणून सेवाव्रती जीवन स्वीकारले. ४१ वर्षांच्या निरंतर राष्ट्रसाधना काळात त्यांनी विदर्भातील कारंजा, मेहकर, गोंदिया, भंडारा आदी ठिकाणी तालुका, जिल्हा व विभाग प्रचारक म्हणून दायित्व सांभाळले. त्यानंतर रा. स्व. संघाच्या महाल येथील केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम केले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे खापरी येथील उत्कर्ष मंडळाची जबाबदारी देण्यात आली. २०२१ पासून ते डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील व्यवस्था विभागात कार्यरत होते. शांत, सुस्वभावी, निरलस आणि कर्तव्यकठोर स्वयंसेवक म्हणून ते परिचित होते.