भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन

0

नागपूर(Nagpur):भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री आणि जलसंधारण मंत्री श्री. महादेवरावजी शिवणकर यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे विदर्भाच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि निष्ठावंत नेतृत्व हरपले आहे.

महादेवराव सुकाजी शिवणकर यांचा जन्म 7 एप्रिल 1940 रोजी झाला.
ते 1978, 1980, 1985, 1995 आणि 1999 मध्ये आमगाव (विधानसभा मतदारसंघ) येथून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.
१९९५ साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये (शिवसेना-भाजप) त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि जलसंधारण मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले. मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये जलसंधारण खात्याचे मंत्री असताना त्यांनी राज्यातील जलसंधारणाच्या कामांना गती दिली.
एक मितभाषी, अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असलेले नेते अशी त्यांची ओळख होती. भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी त्यांनी विदर्भात मोठे योगदान दिले.

आमगाव विधानसभा मतदारसंघात १९९५ ची निवडणूक महादेवराव शिवणकर यांच्यासाठी करो या मरो सारखी होती. हरले तर पुन्हा कॉलेजात प्राध्यापक आणि जिंकले तर मंत्रीपद असे दोनच पर्याय राहीले होते. परंतु महादेवराव शिवणकर आणि भरत बहेकार या दोघांत शेवटपर्यंत रंगलेली निवडणूक कोणालाही झुकता माप देताना दिसत नव्हती. परंतु काट्याच्या लढतीत शेवटी शिवणकरांनी बहेकार यांच्यावर २२४८ मतांनी विजय मिळविला. निवडणूक जिंकताच राज्यातील युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री बनले.
श्री. शिवणकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते चिमूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले.
त्यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टीची तसेच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि मान्यवरांनी श्री. शिवणकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.