स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी वर्ष उद्घाटन समारोह 6 ऑगस्‍ट रोजी

0

रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रमुख मार्गदर्शन
वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेच्या काळातील अग्रणी कार्यकर्ते, स्‍वामी विवेकानंद शीला स्‍मारकाच्या संकल्पनेत प्रमुख भूमिका असलेले, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे दक्षिणेतील पहिल्या फळीतील प्रचारक व विद्यार्थी – युवकांचे प्रेरणास्‍थान स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे 7 ऑगस्‍ट 2023 ते 7 ऑगस्‍ट 2024 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्‍हणून साजरे केले जात आहे. त्‍यानिमित्‍त वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्‍यात आली आहे.

जन्‍मशताब्‍दी वर्षाचा भव्‍य उद्घाटन सोहळा येत्‍या, 6 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्‍यात आला आहे. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्‍तात्रेय होसबळे यांचे उपस्‍थ‍ितांना प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष प्रा. डॉ. राजशरण शाही यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी देशभरातील विद्यार्थ्‍यांना स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर यांच्या कार्याविषयी कळावे म्हणून त्यांच्या मराठी, हिंदी व इंग्रजीतील लघुजीवनीचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात येईल. या कार्यक्रमाला विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यातून जुने नवीन कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहणार आहेत.
कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी समारोह समितीच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त वर्षभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये व्‍याख्‍यानमाला, पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन, शिक्षण क्षेत्रात देदिप्यमान कार्य करणाऱ्यांना पुरस्‍कार असे विविध उपक्रम आयोजित करण्‍यात येणार आहेत. ऑक्‍टोबर 2023 मध्‍ये ‘संघ स्‍वयंसेवक दत्‍ताजी’ विषयावर व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात येणार असून डिसेंबर 2023 मध्‍ये विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्‍यांचे विदर्भ व जिल्‍हास्‍तरीय संमेलन घेण्‍यात येणार आहे. दत्‍ताजी डिडोळकर यांचे नाव त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामार्फत पुरस्‍कार व व्याख्यान या स्‍वरूपात जोडण्यासाठी प्रयत्‍न केले जाणार आहेत. मे 2024 मध्‍ये स्‍व. दत्‍ताजींचा चरित्रग्रंथ ‘आधारवड’ च्‍या मराठीमधील दुस-या आवृत्‍तीचा तर हिंदीतील पहिल्‍या आवृत्‍तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्‍यात येईल. जन्‍मशताब्‍दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम ऑगस्‍ट 2024 मध्‍ये घेण्‍यात येईल. यात शिक्षण क्षेत्रातील स्‍व. डिडोळकर यांच्‍या योगदानासाठी त्‍यांच्‍या नावे पुरस्‍कार वितरण व स्‍मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे.

स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर यांचा परिचय

दत्‍ताजी डिडोळकर यांचा जन्‍म बुलढाणा जिल्‍ह्यातील मलकापूर येथे 7 ऑगस्‍ट 1924 रोजी झाला, त्यांचे कुटुंब जळगाव जामोद तालुक्यातील डिडोळ येथील होते. नागपुरातील पटवर्धन हायस्‍कूल, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍स येथून शिक्षण घेतल्‍यानंतर त्‍यांनी सर्वप्रथम केरळ येथील कालिकत येथे आणि नंतर यावेळच्या दक्षिणेतील एकत्रित मद्रास प्रातांचे प्रांत प्रचारक म्‍हणून दायित्‍व सांभाळले. पुढे सरसंघचालक श्री गुरुजींच्या प्रेरणेने काही युवक मंडळीनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्‍थापना केली, त्यात दत्ताजी अग्रणी होते. १९४९ मध्ये विद्यार्थी परिषदेची विधिवत स्थापना झाली. कन्‍याकुमारी येथील स्‍वामी विवेकानंद शीला स्‍मारकाच्‍या संकल्पनेत व उभारणीत त्‍यांचे महत्‍वाचे योगदान राहिले असून नागपुरात विविध महाविद्यालयातील उत्तम शिक्षकांना एकत्रित करून त्यांचे मार्गदर्शन सर्वच विद्यार्थ्यांना मिळावे, याकरिता जयंत ट्युटोरियल कॉलेजची सुरुवातही त्‍यांनी केली होती. त्या काळात ही एक अभिनव कल्पना म्हणून नावाजली गेली होती. त्यावेळी अमरावती, गोंडवाना आणि नागपूर विभागासाठी असलेल्या नागपूर विद्यापीठात त्यांनी सिनेट आणि व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केले. त्या काळात विद्यापीठात कार्यरत विविध विचार प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाशी समन्वय ठेवून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. नंतर विश्‍व हिंदू परिषदेचे पश्चिमांचाल संघटनमंत्री राहिलेल्‍या डिडोळकर यांचे 14 ऑक्‍टोबर 1990 साली नागपुरात निधन झाले.

पत्रकार परिषदेला स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी समारोह समितीचे अध्‍यक्ष व केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी संबोधित केले. यावेळी समारोह समितीचे सचिव माजी खा. अजय संचेती, उपाध्‍यक्ष अरुण लखानी, संयोजक डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. रामदास आंबटकर, सुनील पाळधीकर, भूपेंद्र शहाणे, विनय माहुरकर, विक्रमजीत कलाने, अजय चव्हाण व इतर सदस्‍यांची उपस्‍थ‍िती होती.