

बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश – मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)
नागपूर (Nagpur )– महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन करण्यासाठी मी पवित्र दीक्षाभूमी येथे आलो आहे. डॉ बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. संसदेमध्ये सकाळीच मी जयंती साजरी करून थेट नागपूरमध्ये आलोय. ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. त्याच वाटेवर सर्व लोक चालावेत हीच आमची अपेक्षा आहे असे दीक्षाभूमीला अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवणं आणि लोकशाहीला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे. यामुळे देशातील सामान्य लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल. संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि लढत राहू असे खर्गे म्हणाले.
भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे यासंदर्भात छेडले असता ही चर्चा करण्याची ही जागा नाही.या स्थळाला मी धार्मिक स्थळ मानतो, त्यामुळे या विषयावर मी पब्लिक मीटिंगमध्ये त्यांचा जाहीरनामा आणि आमचा जाहीरनामा यासंदर्भात सविस्तर बोलेन असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.