
(Wardha)वर्धा :
सरूळचे पोलीस पाटीलच यशोदा नदीतील काळ्या रेतीचा तस्कर असल्याचे उघड झाल्यानं पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेतीच्या या तस्करीत 12 वर्षांपूर्वी केवळ 12 एकर जमिनीचे मालक असलेले पोलीस पाटील आज तब्बल 52 एकर जमिनीचा मालक कसे झाले, याबाबतचा खुलासा या प्रकरणामुळे होऊ लागला आहे.
सतत सहा दिवस रात्रीच्या काळोखात रेतीचा काळा बाजार करणाऱ्या पोलीस पाटलांची काळी कहाणीही यामुळे उघड झाली आहे.
सरूळ गावालगत यशोदा नदीचे हे मोठे पात्र आहे. इथं दर वर्षी मोठ्या प्रमाणात काळ्या रेतीचा साठा संकलित होतो. मात्र या पात्रातील रेती ट्रॅक्टरनं काढण्यासाठी गावाच्या शिवेवरून एक पांदनरस्ता गेला आहे खरा, पण हा रस्ता नदीपात्रापर्यंत जात नाही. यावर उपाय म्हणून पोलीस पाटलाने वेगळीच शक्कल लढवली. त्याने काही शेतकऱ्यांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्या जमिनी मक्त्याने घेतल्या, पण तरीही थेट नदी पात्रापर्यंत ट्रॅक्टर नेणे शक्य नव्हते. म्हणून या पोलीस पाटलाने रस्त्यात येणाऱ्या बाभूळ आणि कडूलिंबच्या झाडावर कुऱ्हाड चालविली आणि थेट JCB ने रस्ता तयार केला.
आता हा पोलीस पाटील जवळपास रोजच रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत ट्रॅक्टरने रेतीची चोरी करतो. आजही त्याच्या फॉर्म हाऊस लगत रेतीचे ढिगारे उभे झाले आहेत. ते महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिसत नाही का आणि दिसत असतील तर या प्रकरणात कारवाई का होत नाही, हाच प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.