

चंद्रपूर (Chandrapur) :- सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे मेजर ध्यानचंद्र जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या 250 गुणवंत खेळाडूंना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रकसूट आणि ब्लेजर देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री. अरविंद पोरेडडीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, तर उपाध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू इंद्रजित रंधावा, राजेश नायडू, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य माधमशेट्टीवार, डॉ. पुष्पांजली कांबळे, विभाग प्रमुख किशोर सर, आणि क्रीडा विभाग प्रमुख कुलदीप गोंड मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद्र यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही यश मिळवावे असा संदेश दिला.
क्रीडा विभाग प्रमुख कुलदीप गोंड यांनी महाविद्यालयातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये गाठलेल्या यशाबाबत माहिती दिली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.