
भाषा आणि साहित्य हा काळाला जोडणारा सेतू : विनिता तेलंग
भाषा ही कुठल्याही संस्कृतीची सर्वात सकस आणि प्रवाही अभिव्यक्ती असते. साहित्यिकांना संस्कृती घडविणाऱ्या इतिहासकालीन व्यक्तिरेखा,थोर चरित्रे यांचे कायम आकर्षण असते. अशा व्यक्तिरेखांचा आढावा घेताना त्या चरित्रातील चिरंतन जीवनमूल्यांचा वेध घेण्याचे भान लेखकाने बाळगले तर भाषा दोन काळांमधील संवादसेतू बनते,असे प्रतिपादन सांगली येथील प्रसिद्ध लेखिका,नाटककार विनिता तेलंग यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संस्कार भारती नागपूर महानगराच्या साहित्य विभागाद्वारे आयोजित एका परिचर्चेत मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
लता मंगेशकर यांचेवरील आस्वादक लेखसंग्रह
‘रसमयी लता ‘, योगी अरविंद यांच्या सावित्री महाकाव्यावर आधारित कादंबरी ‘सूर्यकन्या सावित्री’, नुकतेच राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त संगीत नाटक ‘संगीत आनंदमठ’, या आपल्या गाजलेल्या लेखन कृतीतील भावसौंदर्य उलगडून दाखवताना तेलंग यांनी त्यांच्या लेखन प्रेरणांवर विस्तृत भाष्य केले.
भाषा आणि समाज यांच्यात अन्योन्य संबंध असतो. साहित्याने समाज जोडायचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी आपल्या साहित्य कृतीमध्ये त्याकाळातील व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक गुणदोषांऐवजी त्यांच्या कार्यामागील कार्यकारण भाव आणि वर्तमान परिस्थिती संदर्भात त्याचे सुसंगत परिशीलन व्हायला हवे. आज पुराणकथांतील गूढार्थ शोधून त्यातील नैतिक उपदेश समाजासमोर आणणे अतिशय महत्त्वाचे आहे,असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.
संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री, प्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोनी परिचर्चेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध लेखिका रश्मी पदवाड मदनकर, कथा लेखिका डॉ प्रगती वाघमारे, नाट्यकर्मी दीपाली घोंगे, डॉ पूनम जैन, मनोज श्रोती, श्रीकांत बंगाले, लेखिका आसावरी गोसावी यांनी परिचर्चेत सहभाग घेतला आणि मराठी भाषा व समकालीन साहित्य यावर आपले विचार मांडले. संस्कार भारतीचे महानगर मंत्री मुकुल मुळे यांनी अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभारप्रदर्शन प्रसाद पोफळी यांनी केले.


















