संजय राऊतांच्या लहान भावाचीही चौकशी होणार

0

(Mumbai)मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात (Khichadi Scam in BMC) खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राजाराम राऊत (Sandeep Raut Inquiry) यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

संदीप राऊत यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांचीसुद्धा चौकशी झाली होती.

मुंबई महापालिकेने लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. या मजुरांना खिचडी पुरविण्याचे कंत्रात ५२ कंपन्यांना देण्यात आले होते. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला असून त्यात घोटाळा झाल्याचे आरोप आहेत. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.