

नागपूर(Nagpur) -राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेनेने(Shiv Sena) उमेदवार परस्पर जाहीर केल्याने सांगली लोकसभा मतदारसंघावरून सुरू असलेला तिढा संपता संपण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut)सांगलीच्या दौऱ्यावर असताना काल रात्री दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी दुपारी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम,संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी नागपूर गाठले.काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ रॅली संपल्यानंतर राज्याचे प्रभारी रमेश चेंनिथला,राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची हॉटेलात भेट घेतली. कदम- पाटील या दोघांशी बंदद्वार झालेल्या चर्चेत काय ठरले हे लवकरच कळणार आहे. मात्र, सांगलीचा दावा आम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत बिघाडी होईल असे कुठलेही वक्तव्य करू नये. त्यांनी स्पष्टपणे कुणाशी चर्चा झाली त्या नेत्यांची नावे जाहीर करावी अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी या नेत्यांशी भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. सांगलीची जागा कुणाची हे एखाद्या जनावराला देखील माहित आहे असे विधान कदम यांनी केले.आम्ही आमचा संयम ढळू देत नाही तीच अपेक्षा राऊत यांच्याकडूनही आहे असे सांगितले. दुसरीकडे संजय राऊत यांनी सांगलीच्या दौऱ्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला. प्रचारही सुरू झाला यामुळे आता कुठलीही चर्चा नाही, काँग्रेस राष्ट्रवादीने परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावे, आम्ही त्यांना रामटेक व इतर अनेक जागी सहकार्य करण्यास तयार आहोत अशी भूमिका घेतली. एकंदरीत गेले काही दिवस सुरू असलेल्या सांगलीचा तिढा कधी संपेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. व्यक्तिगत आरोप नको लवकरच निर्णय -रमेश चेंनिथला दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेंनिथला यांनी व्यक्तिगत आरोप कोणीही करू नये, विश्वजीत कदम, मुकुल वासनिक व विशाल पाटील यांच्याशी आपली सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाविषयीची चर्चा झाली. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन चालण्याचा महाविकास आघाडीचा व काँग्रेसचा प्रयत्न आहे. स्थानिक नेत्यांच्या मागणीचा विचार करू व या संदर्भात नक्कीच पक्षप्रमुखांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे चेंनिथला यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.