

– खासदार सांस्कृतिक महोत्सवात युवा मनाची छेडली तार
नागपूर (Nagpur) : “क्या हुवा तेरा वादा” हे अंशी नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध गाणे गाऊन सनम बँडच्या कलाकारांनी जेव्हा व्यासपीठावर प्रवेश केला तेव्हा उपस्थित तरुणाईच्या मनाची गुलाबी तार तर छेडल्या गेलीच पण सध्या पन्नाशीच्या वर वयोगटातील असलेल्या नागपूर रसिकांसमोर जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ साक्षात उभा राहिला.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आठव्या दिवशी, आज विश्वविख्यात सनम बँड च्या सनम पुरी, समर पुरी (गिटार), केशव धनराज(ड्रमर), वेंकट सुब्रमण्यम (बास गिटार) या प्रफुल्लित, प्रतिभासंपन्न युवा कलाकारांनी लाईव्ह इन काँसर्ट मध्ये मधाळ सुरांची मनोरम पखरण केली.
विश्वविख्यात ‘सनम बँड ‘ चे युथफुल सादरीकरण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कलागुणांचा संगम असलेला हा खासदार सांस्कृतिक महोत्सव हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा नायडू, स्मिता वाघ, जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
ये राते ये मौसम, आपकी नजरोंने समझा या गाण्यांवर श्रोत्यांनी मोबाईलचे टॉर्च ऑन करून रसिकतेची प्रचिती दिली. तुझसे नाराज नही जिंदगी, लग जा गले, लिखे जो खत तुझे, एक लडकीको देखा तो ऐसा लगा, पल पल दिलके पास, सूरमयी शाम आती है, पहला नशा, तू है वही
या गीतांनी अननुभूत, उत्कट, चैतन्यमयी समॉ बांधला. या युवा कलाकारांचे सूर उत्तरोत्तर रसिकमनावर अधिराज्य करीत गेले. व्यसनाधीन व्यक्तीला व्यसन मुक्ती देण्यासाठी मदत करा, कलेचे व्यसन जोपासा, एकमेकांवर मनापासून प्रेम करा, असे आवाहनही याप्रसंगी सनम पुरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी आणि डॉ. ऋचा सुगंध यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, किशोर पाटील, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, रेणुका देशकर, अब्दुल कादीर, मनीषा काशीकर यांनी केले.
******
व्यसनाधीनतेला हद्दपार करू
– रवींद्र सिंगल
सध्या तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे. सुदृढ भारतासाठी, पोलीस डिपार्टमेंटने अंमली पदार्थ विरोधात मोठी जागरूकता मोहीम ‘ऑपरेशन थंडर ‘ आरंभ केली आहे. त्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व आवश्यकता असल्यास 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याप्रसंगी केले. मुंबई, पुण्यासारखे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम नागपूरकरांसाठी या महोत्सवाच्या माध्यमातून निःशुल्क सुरू केल्याबद्दल सिंगल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.
****
आज महोत्सवात….
सकाळी 7 वाजता भक्तीमय वातावरणात श्री सुंदरकांड पठण व सायं. 6 वाजता उदित नारायण – लाईव्ह इन कॉन्सर्ट होईल.