

– ‘सम्या, सम्या मैफलीत माझ्या’ ने रसिक तृप्त
– खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम
– रसिकांची भरगच्च उपस्थिती
नागपूर (Nagpur), 26 मे
टीव्हीवरील मालिकांमधून विनोदी संवादाने हसविणार्या हास्यजत्रा फेम कलावंत समीर चौघुले यांनी आपल्या विनोदी संवादाच्या माध्यमातून सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात प्रत्येकाच्या वागणुकीदरम्यान होणारे किस्से आणि प्रत्यक्ष जाणवणार्या प्रेमाच्या गप्पा आणि नियमित जीवनात अजाणतेपणी होणार्या कृतींची आठवण करून देत रसिकांना मनसोक्त हसविले.
रसिकांना निखळ हास्याचा आनंद वारंवार देत संपूर्ण कार्यक्रम केव्हा संपुष्टात आला हे उपस्थितांना कळलेच नाही. मुळात प्रेमसंवाद, डेट संदर्भात घ्यावयाची काळजी व त्यातून अजाणतेपणी निर्माण होणारे विनोद चौघुले यांनी सादर करीत रसिकांच्या मुरकुंड्या वळवल्या.
चित्रपटासाठी प्रेयसीसोबत जाताना घ्यावयाची काळजी व मॅनर्स आदींची माहिती, मराठी भाषेतून व गाण्यातून निर्माण होणारे विनोद रसिकांना भावले कार्यक्रम पूर्ण होईस्तोवर रसिकांची भरगच्च उपस्थिती कायम होती.
रेशीमबागस्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे हास्यजत्रा फेम लेखक, अभिनेते, तसेच आपल्या अनोख्या अभिनय शैलीने रसिकांच्या मनावर राज्य करणार्या समीर चौघुले यांचा ‘सम्या सम्या मैफलीत माझ्या’ हा विशेष हास्य कार्यक्रम आयोजिला होता.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योजक सत्यनारायण नुवाल, निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, माजी खासदार दत्ता मेघे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ. मदन कापरे, माजी खासदार अजय संचेती, वनराईचे डॉ. गिरीश गांधी, माजी खासदार कृपाल तुमाने, दयाशंकर तिवारी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता, डॉ. गौरीशंकर पाराशर, माजी आमदार अशोक मानकर, राजेश बागडी, डॉ. दीपक खिरवडकर, अविनाश घुशे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे नितीन गडकरी यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच, प्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौघुले यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. गोविंद वर्मा, अॅड. कुमकुम सिरपूरकर, निखिल मुंडले, रवींद्र दुरुगकर, कांचन गडकरी, डॉ. शशीकांत चौधरी, माजी आमदार गिरीश व्यास, धनंजय बापट, रवींद्र बोरटकर, विष्णू मनोहर, सीए दिलीप रोडी, माधवराव शेंबेकर, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूर माझे मी नागपूरचा – नितीन गडकरी
नागपुरकरांसाठी विविध खासदार महोत्सव आयोजित केल्याने त्यातून अनेक कलावंत, खेळाडू घडले. ज्येष्ठांसाठी विविध योजना राबविल्या, याचा मला अभिमान आहे. हे मी सगळे माझ्या नागपूरवासीयांसाठी केले, कारण नागपूर माझे आहे आणि मी नागपूरचा आहे, असे सत्काराला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी भावोद्गार काढले. अनेक तीर्थस्थळांना जोडणार्या रस्त्यांची निर्मिती माझ्या हाताने झाली याचाही मला अभिमान आहे. आपली संस्कृती, इतिहास आणि विरासत आपली प्रेरणा आहे. ती लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न खासदार सांस्कृतिक समितीने केला असल्याचे गडकरी म्हणाले. एकाचवेळी लाख लोक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील, असे स्पेनमधील स्टेडियमसारखे भव्य स्टेडियम नागपूरला व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.