

Cultural Festival : खासदार सांस्कृतिक महोत्सव (MP Cultural Festival) समितीच्या वतीने, केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवार, २६ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे सोनी टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक समीर चौगुले यांची ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ ही विशेष हास्यसंध्या आयोजित करण्यात आली आहे.
या मैफिलीत अभिनेते व लेखक समीर चौगुले आपल्या खास शैलीतून किस्से, गोष्टी, विनोदी निरीक्षणे, गप्पा, आणि रंगतदार संवादातून प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहेत. मराठी रंगभूमीवर आपल्या अनोख्या अभिनयशैलीसाठी ओळखले जाणारे समीर चौगुले यांचा हा खास कार्यक्रम नितीन गडकरी यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि लोकांशी असलेल्या घट्ट नात्याचा एक सांस्कृतिक साज चढवणारा ठरणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव ही नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेतील एक भव्य चळवळ बनली असून, या महोत्सवांतर्गत दरवर्षी दर्जेदार, बहुआयामी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही, नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका अनिवार्य आहे. या प्रवेशिका मा. श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, खामला चौक व सुरेश भट सभागृहातून सकाळी 11 ते 2 या वेळात प्राप्त करता येतील. सर्व नागपूरकर रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून समीर चौगुले यांच्या या हास्यसंध्येचा आनंद लुटावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.