बबन सराडकर यांना साहित्य कला सेवा मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार

0

नागपूर, समाज प्रबोधन आणि परिवर्तन ही साहित्यिकांची जबाबदारी असून, साहित्यिकांनी या सामाजिक जबाबदारीचे भान जपत साहित्य निर्मिती करावी असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गझलकार बबनराव सराडकर यांनी येथे केले.

साहित्य कला सेवा मंडळाच्या ५४ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुप्रसिद्ध गझलकार डॉ. सागर खादीवाला, ॲड. श्रीराम देवरस, प्रा. उमेश हिवसे, दैनिक दिव्य वतनचे मुख्य संपादक गोपाळ कडूकर, साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष राजेश कुबडे प्रभृती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला कला मंडळाच्या दखलपात्र कार्य करणाऱ्या सदस्यांचा व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचासत्कार पार पडला. बबनराव‌ सराडकर यांचा शाल, श्रीफळ व‌ स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

डॉ सागर खादीवाला यांनी साहित्य जगतातील उत्कृष्ट कार्याचा कालसापेक्ष गौरव ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कुहीकर यांनीही समाजातील नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी साहित्यिकांच्या सकारात्मक भूमिकेची आवश्यकता प्रतिपादीत केली. ॲड. श्रीराम देवरस, प्रा. उमेश हिवसे यांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत.

साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष राजेश कुबडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे संचालन सौ. हर्षाताई कोठेकर यांनी तर आभारप्रदर्शन रमेश बेलगे यांनी केले.

डॉ. संध्या पवार, डॉ. राजेश नाईक, नं. भा. कोहळे, चंद्रशेखर वाघमारे, डॉ. शांतीदास लुंगे, , ॲड. नागेश दंडे, सुनील भागवत, शिवशंकर डेकाटे, अंकुश शिंगाडे, प्रा. डॉ प्रशांत राऊत, पी जी भोसले, प्रीती भोसले, सविता प्रबाळे, राजू डहाके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.