औद्योगिक कामगारांची सुरक्षितता

0
people working on building during daytime

 २ नोव्हेंबर | औद्योगिक सुरक्षा दिन

आपल्या भारतीय उद्योग क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. या भारतीय उद्योगक्षेत्रांत विविध पदार्थांची निर्मिती होते. सारीच उत्पादने ही साठवताना किंवा हाताळताना सुरक्षित असतात असे नव्हे. कित्येकदा कच्चा माल म्हणून वापरले जाणारे पदार्थ स्फोटक आणि विषारी असू शकतात. त्यांना विशिष्ट तापमानात किंवा विशेष स्थितीत साठवून ठेवावे लागते किंवा हाताळावे लागते. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आपल्या उत्पादनांचा पुरवठा अथवा मार्केटींग करताना त्यांच्या संबंधीची MSDS पत्रके पुरवावी लागतात. MSDS म्हणजेच Materials Safety Data Sheets. या पत्रकांत त्या त्या पदार्थांची रासायनिक रचना किंवा त्यातील रासायनिक घटक, त्याचे गुणधर्म, त्याचे सुरक्षा मूल्य, त्यापासून उद्भवणारे धोके, त्याची साठवणूक करण्याची प्रक्रिया, ते हाताळताना घ्यावयाच्या दक्षता इ. ची माहिती पुरवलेली असते. ही MSDS म्हणजे संपूर्ण सुरक्षेची हमी असा समज उद्योगक्षेत्रात केला जातो. परंतु तो संपूर्णतया सत्य नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता समजा त्वचेला इजा पोहचविणारी रसायने शेकडो-हजारो असतात. त्यांचा सगळ्यांचा निर्धोकपणा (रिस्क असेसमेंट) तपासून झालेला नसतो. फक्त ज्ञात असलेल्या रसायनासंबंधी आपल्याला MSDS मधून इशारा मिळतो. पण अज्ञात रसायनांचं काय? तेव्हा वाजवीपेक्षा जास्त काळजी घेतलेली बरी, असा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. तसेच दुसरं म्हणजे आपण वेगवेगळी रसायने वा पदार्थ आपल्या कामासाठी खरेदी करतो. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या सुरक्षा-पत्रिका असतात. परंतु ज्यावेळी आपण दोन किंवा अधिक रसायने किंवा पदार्थ मिसळतो तेव्हा निर्माण होणाऱ्या नवनिर्मिती पदार्थांच्या सुरक्षतेविषयी काय, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

आता हेच पहा ना, दोन पदार्थांची मिसळ करताना ते तापविले जातात, एकत्र कुटले जातात, त्यांना एकमेकांत विरघळविले जाते; या व अशा प्रक्रियांत काही जे धोके दडलेले असतात त्याची पूर्ण कल्पना जी मंडळी ते पदार्थ हाताळतात त्यांना असणे गरजेचे असते. एक विलक्षण उदाहरण द्यायचं म्हटलं तर, ग्लायकोल हे द्रवरुप रसायन पोटॅशियम परमेग्नेट या पावडररुपी रसायनाच्या संपर्कात आले तर आपोआप पेट घेते व ज्वाला भडकते. पदार्थांची रचना (डिझाईन), उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यक्तिने तो पदार्थ कामाच्या ठिकाणी उत्पादकाने कसा हाताळावा यासंबंधी पूर्ण माहिती देणे बंधनकारक असते. एखादा उत्पादक दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून माल घेत असेल व तो मिसळून नवीन उत्पादन तयार करीत असेल, तर उत्पादकाच्या कारखान्यातील सुरक्षिततेची जबाबदारी नक्की कुठल्या पुरवठा धारकांवर असेल, हा प्रश्न येतो. एकतर त्या तिघांनाही त्या उत्पादकाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती असणे गरजेचे ठरते किंवा त्यांना एकमेकांच्या मालाविषयी माहिती मिळवणे अगत्याचे ठरते. औद्योगिक क्षेत्रात गोपनियतेच्या सबबीखाली हे शक्य आहे का? महत्वाचे म्हणजे पाश्चिमात्य देशात कामाच्या ठिकाणी कामगारांच्या स्वास्थ्याला इजा होणारी घटना घडली तर तात्काळ चौकशी होऊन नुकसानभरपाई दिली जाते. तसले दावे तिथे सर्रासपणे केले जातात. पण आपल्याकडे अज्ञानात आनंद असल्याचा प्रकार आहे. तो आता थांबायला हवा. आपल्या भारतीय औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा धोरण आणखी ठाम हवे. कामगारांची सुरक्षा व आरोग्या बाबतचे ध्येय आणि उद्दीष्टे तसेच ते पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक आहे. यात सेफ्टी ऑडिट, रिस्क असेसमेंटचा समावेश गरजेचा मानावा. तसेच आपल्या सर्व भारतीय कामगारांना सुरक्षितपणे काम करण्याची कौशल्ये ही प्रशिक्षणाद्वारे विकसित करायला हवीत. ऑक्सीजनची कमी किंवा विषारी वायू असलेल्या ठिकाणी वर्क परमीट पद्धतीचा उपयोग करायला हवा. तसेच कामगारांना माहिती, सूचना आणि प्रशिक्षण द्यायला हवे. नविन कामगारांना इंडक्शन प्रशिक्षण, विषेश कालावधीनंतर पुन्हा प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

प्रत्येक धोकादायक प्रोसेसचा वापर केल्या जाणाऱ्या कारखान्या मध्ये सुरक्षा समितीची स्थापना करणे आवश्यक. या समितीची प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा बैठक होणे गरजेचे आहे. या समितीत व्यवस्थापन तसेच कामगार प्रतिनिधींचा समावेश असावा. नुसती सुरक्षा यंत्रणा उभारुन उपयोग नाही. ठराविक कालावधीनंतर कारखान्यात सुरक्षा निरीक्षण करणे, काही त्रुटी आढळल्यास त्यात सुधारणा करणे या बाबीही तितक्याच महत्वाच्या आहेत. भारतीय कारखान्यातील प्रत्येक विभागातील प्रतिनिधींना एकत्र आणून सुरक्षा सुधारणा संघ स्थापन करणे आवश्यक आहे. ठराविक कालावधी नंतर किंवा अचानक भेट देऊन कामाची पाहणी करण्याचे काम हा संघ करेल अशी योजना असावी. दुर्दैवाने वा नजरचुकीने कारखान्यात झालेल्या अपघाताची तपासणी व विश्लेषण करणे, अपघाताचे कारण आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करणे महत्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीय कारखान्याने कारखाना कायद्या व्यतिरिक्त आवश्यकता असल्यास या कायद्याच्या तरतुदींची सुसंगत कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य विषयक नियम तयार करावेत व ते कसोशीने पाळणे गरजेचे आहे. या सर्वांच्या जोडीला कारखान्यातील यंत्रांचे ठराविक कालावधीनंतर मेंटेनन्स करणे, सर्व्हिसिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक कारखान्याने सुरक्षितता आणि आरोग्यविषयक जागृती निर्माण करावी आणि सुरक्षित कामासाठीची संस्कृती निर्माण करण्यासाठी कामगारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे प्रोत्साहन द्यावे. या सोबतच काम करताना संभाव्य धोक्यांचा अभ्यास करुन, तो कमी करण्यासाठी उपाययोजना करता येण्याचे प्रशिक्षण ही आवश्यकच आहे. ज्या ज्या कारखान्यात धोकादायक पदार्थांचा वापर होत असेल, त्या त्या कारखान्यांनी त्याविषयीची संपूर्ण माहिती कामगारांना देणे, तसे माहिती पत्रक व सुरक्षा साधने उपलब्ध करुन देणे शासनाने बंधनकारक करावे. आपण एवढे सारे केल्या नंतरही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी वेगळे नियोजन प्रत्येक कारखान्याने तयार ठेवावे व याची माहिती सर्व संबंधितांना आणि कामगारांना देणे आवश्यक आहे. सर्वांत शेवटची आणि महत्वाची सुरक्षा म्हणजे प्रत्येक भारतीय कारखान्याने, आपल्या प्रत्येक कामगाराचा अपघात विमा उतरविणे अत्यंत आवश्यक आहे.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक/संस्कार व शिक्षण जागृती*