
मॉस्को(Mascow)
कॅन्सरच्या रुग्णांना आता रशियाने आनंदाची बातमी दिली आहे. कॅन्सरवर लस तयार केल्याची माहिती रशियाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.रशियातील नागरिकांसाठी ही लस मोफत असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी सांगितले की, ही लस २०२५ च्या सुरुवातीला लाँच केली जाणार आहे.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला की, त्यांनी कर्करोगाची लस विकसित केली आहे. अहवालानुसार, ही लस कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी असेल. तथापि, या लसीचा वापर ट्यूमरची निर्मिती रोखण्यासाठी केला जाणार नाही. यापूर्वी, रशियाकडून आलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, लसीचा प्रत्येक शॉट रुग्णासाठी स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आहे. पाश्चात्य देशांमध्ये विकसित केल्या जात असलेल्या कर्करोगाच्या लसींप्रमाणेच असेल.
रशियन नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि गामालेया नॅशनल रिसर्च सेंटरसह रशियन आरोग्य मंत्रालयाने या लसीबाबत पुष्टी केली आहे. तसेच लस कशी कार्य करते, हेही स्पष्ट केलं आहे.ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर रशियाने तयार केलेल्या लसीचे नाव अद्याप ठरलेले नाही.
आज जगभरात कर्करोगाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. रशियासारख्या देशातही या आजाराचे प्रमाण चिंताजनक आहे. 2022 मध्ये रशियात कर्करोगाच्या 6,35,000 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोलन, स्तन आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे सर्वात सामान्य प्रकार आहेत. अशा परिस्थितीत रशियाच्या या नव्या लसीचा दावा जगभरातील कर्करोगग्रस्तांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकतो. कर्करोगावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून जगभरात संशोधन सुरू आहे. रशियाच्या या नव्या यशामुळे कर्करोगाविरोधातील लढाईत एक नवीन दिशा मिळाली आहे. ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करणारी आणि त्याचा आकार कमी करणारी लस तयार करणे हे निश्चितच विज्ञानातील मोठे यश मानले जाईल. 2025 पासून ही लस बाजारात उपलब्ध होईल, तेव्हा तिच्या यशस्वीतेबाबत अधिक माहिती मिळेल. सध्याच्या परिस्थितीत, या लसीमुळे कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. या यशामुळे रशियाने आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.













