वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्‍या कार्याला 2000 कलावंतांचे अभिवादन

0
nagpur खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२५

 

‘खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव-2025’चा चौथा दिवस

नागपूर (Nagpur)10 नोव्‍हेंबर :-
आध‍ुनिक काळातील महान संत, समाजसुधारक आणि राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रणेते राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन, समाजप्रबोधनाचे कार्य, ग्रामविकास, राष्‍ट्रप्रेम, साहित्‍य, खंजिरी भजन आदींवर प्रकाश टाकणारे नृत्‍य, नाट्य, भजन आदी लोककलांच्‍या माध्‍यमातून 2000 कलाकारांनी राष्‍ट्रसंताना अभिवादन केले. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव-2025’च्या चौथ्‍या दिवशी सायंकाळच्‍या सत्रात वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित दृक श्राव्‍य संगीतमय कार्यक्रम ‘राष्‍ट्रसंतांची जीवनगाथा’ कार्यक्रम पार पडला. भगव्‍या टोप्‍या परिधान केल्‍या राष्‍ट्रसंतांच्‍या भक्‍तांनी परिसर भगवामय झाला होता.

या भारतात बंधूभाव, मनी नाही भाव, तुने सेवा ही न किया है, सच काम किया जग में जिसने, शानदार हो मेरा भारत, माणूस द्या मज माणूस यासारखी जीवनाचे तत्‍वज्ञान सांगणारी, राष्‍ट्रभक्‍ती जागवणारी खंजिरी भजने कलाकारांनी सादर करून वातावरण निर्मिती केली. तुकडोजी महाराज यांचे बालपण, महात्मा गांधी यांची भेट, स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, तुरुंगवास, भजन क्रांती असे अनेक प्रसंग यावेळी सादर करण्‍यात आले. या कार्यक्रमात वारी, भजन, लावणी आदी लोककलांचा वापर करून कार्यक्रम अधिक रंजक करण्‍यात आला.

या कार्यक्रमाचे निर्मिती संयोजन डॉ. देवेंद्र यादव होते तर संगीत संयोजक श्रीकांत पिसे, नृत्‍य दिग्‍दर्शन अक्षय धबडगावकर यांचे तर सूत्रसंचालन देवेंद्र दोडके यांचे होते. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम यांच्‍या विशेष मार्गदर्शनात नृत्य, नाट्य, संगीताने नटलेल्या या कार्यक्रमाचे अमोल बांबल, अशोक यावले, ज्ञानेश्‍वर रक्षक, राजेश कुंभलकर, सुधाकर अंबुसकर, अविनाश घुशे, श्रीरंग व-हाडपांडे हे समन्‍वयक होते. कथा पटकथा लेखक गोपाल सालोडकर तर तांत्रिक सहाय्य मनोज पिदडी, पवन तिवारी व संदीप बारस्‍कर यांचे लाभले.

आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी आमदार नागो गाणार, गुरुकुंज आश्रमचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उप अधिकारी बाबाराव पाटील, जनार्दनपंत बोथे, गोपाल कडू, डॉ. राजाराम बोथे, लक्ष्मण हमे, विजयालक्ष्मी थोटे, ज्ञानेश्‍वर रक्षक, नाना महाराज, अशोक यावले, माणिकदादा, दामोदर पाटील या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. स्‍थानिक कार्यक्रमाचे रिचा सुगंध व अमन चौधरी तर मुख्‍य कार्यक्रमाचे बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.

बोटे आणि नखांच्या सहायाने चित्र रेखाटण्याची कला ही अनोखी असून अश्या काही मोजक्या कलाकारांमध्ये नागपूरचे आय. ए. राजा व त्यांची सुखनत काझी यांचा समावेश आहे. या दोघांनी मिळून यावेळी अप्रतिम निसर्गचित्र रेखाटले. त्यांनी नितीन गडकरी यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र तयार केले असून ते यावेळी त्यांना भेट देण्यात आले. गडकरींच्या हस्ते या दोन्ही कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे लोकप्रबोधनाचे कार्य अतुलनीय असून त्यांनी आपल्या उत्तम सोप्या शब्दांमधून लोकांवर संस्कार करण्याचे काम केले, असे नितिन गडकरी म्हणाले.
नागपूर विद्यापीठ द्वारे नुकताच मानवतेचा संदेश देणारे विद्यापीठ गीत पन्नास हजार विद्यार्थ्यांनी गायले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने नुकताच राष्‍ट्रसंतांच्‍या भजनावर आधारित खंजिरी भजन स्पर्धा आयोजित करण्‍यात आली होती, अशी माहिती देत त्यांनी आज 2000 कलाकार राष्ट्रसंताचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, असे सांगितले.