

रमाकांता झाली लिखित लिहिता तातडी मला I
नसे शाई दौती, प्रचूर मज संदेह गमला I
कळावे ना कोना, हितगुज विचारून वहिले I
कनिष्ठिने नेत्रांजन घन रसे पत्र लिहिले. I I
विदर्भ राज कन्या “रुख्मिणीने “, भाऊ रुख्मि च्या जाचाला कंटाळून, जिवाच्या तगमगिने व कळकळीने आर्तता स्वरूप, तिचा प्रियकर, जो मनाने वरला होता त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला पत्र लिहिले. तिच्या मनाची अवस्था व पत्र लिहिण्यासाठी निवडलेले साधन याचे नितांत सुंदर वर्णन वरील काव्यात कवीने केले आहे.
विदर्भातील वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सरहद्दीवर, वशिष्ठ किंवा वरदा नावाने पुराणात उल्लेख असलेली, सध्याच्या “वर्धा ” नदीच्या काठावर पण अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या “कौडण्यपूर “नगरात पुरातन काळी, द्वापार युगात “भीष्मक “नावाचा राजा राज्य करीत होता. ही नगरी आजही अस्तित्वात आहे. त्या काळी ही नगरी विदर्भ देशाची राजधानी होती. त्याला रुख्मि नावाचा मुलगा व रुख्मिणी नावाची कन्या होती. रुख्मिणीचे कृष्णावर प्रेम होते. तर तिचा भाऊ रुख्मि च्या मनात तिचा विवाह त्याचा मित्र शिशुपालाशी करून द्यावयाचा होता. रुख्मि व शिशुपाल दोघेही कृष्णाचा द्वेष करीत असत.
भीमक बाळा ती वेल्हाळा टाकुनी गोपाळा I
निश्चय केला बंधुवराने द्यावी शिशुपाळा I
रुख्मिच्या जाचाला कंटाळून रुख्मिणीने चुपचाप वरील पत्र लिहिले.
सुदैव हस्ते प्रेमे पाठविले पत्र I द्वारावतीहून धावूनी येई देवकी पुत्र I
जिंकून शिशुपालदिक दुर्जन अपवित्र I पानिग्रहण करी तुझे कृष्णकमळ नेत्र II
(लक्ष्मी कथा, स्कंध 1,अध्याय (9).)
भगवान श्रीकृष्णाने रुख्मिचा पराभव करून रुख्मिणीचे पानिग्रहण केले ही पुरानातील भावविश्वाची कथा सर्वाना ज्ञात आहेच.
द्वारकेहून या लग्न समारंभाला हजारो वऱ्हाडी (लग्नासाठी आलेली मंडळी )आले होते. त्यातील कित्येक वऱ्हाडी याच भागात वास्तव्यास राहिली व स्थायिक झालीत, म्हणून या प्रांताला वऱ्हाडप्रांत असे नाव पडले. अशीही माहिती मिळते.
भगवंताचे सासर म्हणून वऱ्हाड प्रांत प्रसिद्ध आहे, हे मात्र अभिमानास्पद आहे.
रमेश विनायक पोफळी
पुणे.
भ्र. क्र. 7775900824.