
प्रतिनिधी सभेत आगामी वाटचालीवर मंथन
नागपूर, 03 फेब्रुवारी / RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी गेल्या तीन वर्षात पूर्वी संघाच्या संपर्कात नसलेल्या कुटुंबांशी वैयक्तीक संपर्क प्रस्थापित केला आहे. याद्वारे संघ लवकरच कौटुंबिक शाखा संकल्पनेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. यावर्षी 15 ते 17 मार्च दरम्यान नागपुरात आयोजित प्रतिनिधी सभेच्या बैठकीत याविषयावर विचारमंथन होणार असल्याची माहिती संघाच्या सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुमारे 5 वर्षांपूर्वी कुटूंब प्रबोधन हा विषय राबवण्यात आला. त्यानंतर घरोघरी संपर्क साधून संवाद साधण्यास प्रारंभ झाला. या अभियानासाठी निवडलेली कुटुंबे ही संघ परिचयातील किंबहुना परिवारातील होत. परंतु, अयोध्येतील राम मंदिरासाठी जानेवारी 2021 मध्ये सुरू झालेल्या निधी संकलन अभियानाच्या माध्यमातून संघ परिचयाच्या बाहेरील कुटुंबांशी देखील स्वयंसेवकांनी संपर्क प्रस्थापित केला. यासोबतच गेल्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत झालेल्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता (निमंत्रण) वाटपासाठी देशातील बहुतांशी घराघरांशी संघाचा पुन्हा संपर्क आला. यामध्ये अनेक नवी कुटुंबे संघाशी जोडल्या गेली. या सर्व कुटुंबांची नावे, पत्ते, फोन नंबर्स संघ स्वयंसेवकांकडे आहेत. या सर्व कुटुंबांशी भविष्यातही संपर्क ठेवणार आहे. यातून दररोज शक्य नसल्यास कुटूंबांची किमान साप्ताहिक शाखा घेण्याचा संघाचा मानस आहे. याबाबत यंदाच्या प्रतिनिधीसभेच्या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. एखादी व्यक्ती कुठल्या संस्थेशी किंवा संघटनेशी जोडली गेली तर त्याचे कुटुंब देखील जोडले जाईलच असे नाही. परंतु, जर संपूर्ण कुटूंब एखाद्या विचाराशी जोडले गेले तर ते वैचारिक अधिष्ठान पुढच्या पिढीकडे देखील हस्तांतरित होते. त्यामुळे भारतीय जीवनमूल्ये, संस्कार, परंपरा जोपासण्यासाठी संघ कुंटूंब शाखा आणि कुटुंब प्रबोधन हे कार्यक्रम देशपातळीवर आणि प्रदीर्घकाळ चालवणार असल्याचे संघ सूत्रांनी सांगितले.
यासोबतच आगामी 2025 हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. त्यानुषंगाने सुरू झालेली आणि होणारी कामे यावर देखील प्रतिनिधीसभेत चर्चा होणार आहे. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सिलॅबसमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार क्षेत्र स्तरावर तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग घेतला जाणार आहे. यापूर्वी देशभरातील सर्व स्वयंसेवकांना तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नागपुरातच यावे लागत होते. आता या वर्गाचे बदललेले स्वरूप आणि त्यावरील प्रतिक्रिया यासंदर्भातही यंदाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत चर्चा व चिंतन अपेक्षित आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी प्रतिनिधी सभा होते. यात वर्षभराचा आढावा आणि भविष्यातील योजना व कार्ये याची धोरणे आखली जातात. यात संघ परिवारातील 1200 ते 1400 स्वयंसेवक सहभागी होतात. प्रतिनिधी सभेत दर 3 वर्षांनी सरकार्यवाहांची निवड केली जाते. संघाच्या इतर प्रतिनिधी सभा देशाच्या विविध भागांमध्ये होत असल्या तरी निवडणुकीच्या वर्षी मात्र प्रतिनिधी सभेची बैठक नागपुरातच आयोजित केली जाते. परंतु, कोरोना साथरोगामुळे 2021 मध्ये परंपरा मोडून निवडणुकीची प्रतिनिधी सभा कर्नाटकच्या बंगळुरू येथे घेण्यात आली होती. त्यातच दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली होती. आता आगामी 15 ते 17 मार्च दरम्यान नागपुरात होणाऱ्या प्रतिनिधी सभेत पुन्हा एकदा सरकार्यवाहांची निवड केली जाणार आहे. यात वर्तमान सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड होणार असल्याचे संघातील सूत्रांनी स्पष्ट केले.