

नागपूर NAGPUR : ऊसापासून इथेनॉल Ethanol निर्मितीला बंदी घालण्याचा सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी ऊसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. दरम्यान, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली जाण्याची शक्यता असून ते केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी पत्रात लिहिलेय की, इथेनॉल निर्मितीत ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक साखर कारखान्यांनी (Sugar Factory) केली आहे. इथेनॉल निर्मिती बंदी लागू केली तर कारखान्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे हा उद्योगच अडचणीत येतो आहे. सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी उसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा. केंद्र सरकारने बी हेवी इथेनॉलच्या किंमती ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याच्या इथेनॉलला द्याव्यात. सी दर्जाच्या इथेनॉलची किंमत बी हेवीच्या दर्जाची करावी यातून आर्थिक संतुलन साधता येईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.