
मुंबईः MUMBAI जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु असताना कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० वर्षे करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते, असा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संकेत दिल्याचे महासंघाने म्हटले आहे. (State Government Retirement Age)
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं वय ६० वर्षे आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची शक्यात असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ डिसेंबर रोजी महासंघाने एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारलं होते. मात्र त्यासंदर्भात बैठक झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची एक बैठक निश्चित करण्यात आलेली आहे. बैठकीत जुनी पेन्शन योजना आणि कर्मचाऱ्यांच्या निवृती वयाच्या संदर्भात चर्चा होणार आहे, असे महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी सांगितले.