मुंबई : भारत आणि कॅनडातील वादाचा परिणाम म्हणून बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड दिसून आली. चौफेर विक्रीचे चित्र दिसून आले. दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात ८०० अंकांची घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १.१८ टक्क्यांच्या घसरणीसह ६६,८०० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३१.९० अंकांनी घसरून १९,०० अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्स निर्देशांकातील ३० पैकी केवळ ७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसली. सर्वाधिक घसरण एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये झाली आहे. ही घसरण ३.९० टक्क्यांची असून जेएसडब्लू स्टीलमध्ये २.५६ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दरात २.१८ टक्क्यांची घसरण दिसून आली. टाटा स्टीलचे शेअर्सही १.४६ टक्क्यांची घसरले आहेत. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २.३४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. सोमवारी ३२३ लाख कोटी रुपये असलेले हे बाजार भांडवल बुधवारी ३२० कोटी पर्यंत खाली घसरले होते. या पडझडीला भारत आणि कॅनडातील तणाव कारणीभूत असल्याचे बाजार विश्लेषकांना वाटते. कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्डाने अनेक भारतीय कंपन्यांमध्ये अंदाजे १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सुमारे ३० भारतीय कंपन्या आहेत, ज्यांचा व्यवसाय कॅनडामध्ये पसरलेला आहे आणि त्यांनी ४० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये चिंता वाढली आहे.













