वीर सैनिकांचा सन्मान करूया, सलामी देऊया”

0

स्थल सेना दिवस | १५ऑगस्ट, १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारच्या विशेष विनंतीला मान देत; ब्रिटिश सेनेतील निवडक सेनाधिकारी पुढील काही वर्ष भारतात राहण्यास तयार झाले. ब्रिटिश सरकारनी तत्कालीन फील्ड मार्शल सर क्लॉड ऑकिनलेक यांना, भारत पाकिस्तान सेनेचा सर्वोच्च एकल सेनापती (जॉइंट कमांडर इन चीफ) नियुक्त केल.जनरल सर रॉब लोकहार्ट भारतीय सेनेचे तत्कालीन कमांडर इन चीफ बनलेत. पाकिस्तान सेना, सर क्लॉड यांच्या हाती होती. ०१जानेवारी, १९४८ला,जनरल सर रॉबर्ट रॉय बुचर हे भारताचे कमांडर इन चीफ झालेत.

१५ जानेवारी,१९४९ ला,एक वर्षानंतर, भारताचे लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा, इंडियन आर्मीचे ब्रिटिश कमांडर इन चीफ, जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्यानंतर, भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ बनलेत.त्या दिवशी सकाळी, छातीवर चमकते वीरता पुरस्कार अलंकृत/धारण केलेले लेफ्टनंट जनरल कोदन्देरा मदप्पा करिअप्पा,साऊथ ब्लॉक ऑफिसमधे आलेत. जनरल सर फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बुचर यांनी त्यांच स्वागत केल, हस्तांदोलन करून त्यांना त्यांच्या आसनापर्यंत नेल आणि सन्मानानी कमांडर इन चीफच्या आसनावर विराजमान केल. थोड्याच वेळात सर रॉय बुचर यांनी तेथील सर्वांचा निरोप घेतला.तेव्हापासून, १५ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस “स्थल सेना दिवस:आर्मी डे”म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून ख-या अर्थानी भारतीय सेनेवर पूर्णपणे भारतीय वर्चस्व प्रस्थापित झाल आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली. तोवर ब्रिटिश हुकुमतीखाली असलेल्या सेनेच्या भारतीयकरणाची जबाबदारी आता,पहिल्या भारतीय कमांडर इन चीफची होती.०१ एप्रिल, १९५५ला, कमांडर इन चीफ पदासाठी ‘सेनाप्रमुख’ हे नवीन नामाभिदान देण्यात आल.
स्थलसेना किंवा सेना हे,कोणत्याही लष्कराच मूलभूत अंग असत. नौसेना व वायुसेनासुद्धा तितकेच महत्वाचे असेले तरी, स्थलसेनेच महत्त्व अनन्यसाधारण मानल्या जात. कोणत्याही देशाची भूमी प्रत्यक्षात ताब्यात ठेवून तीच रक्षण करण्याची जबाबदारी स्थलसेनेचीच असते.वायुसेना बॉम्ब वर्षाव करून शत्रूची भूमी उध्वस्त करते,नौसेना शत्रूच्या समुद्री व्यापारी मार्गांची नाकेबंदी करते पण शत्रूची भूमी ताब्यात घेण्याच काम स्थलसेनाच करते.
आपल्या सशस्त्र दलांचे रणांगणावरील अतुलनीय योगदान, धैर्य, बलिदान, कर्तव्या प्रती अतूट बांधिलकी,कर्तव्य बजावतांना दर्शवलेल लक्षणीय शौर्य आणि पराक्रमाला मानाचा मुजरा करण्याचा हा दिवस आहे.या दिवशी,भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी सदैव सीमेवर तैनात असलेल्या सैनिकां प्रती कृतज्ञता व्यक्त केल्या जाते.सेना दिवस साजरा करून आपण, आपला देश आणि त्यातील लोकांच्या रक्षणार्थ आपल जीवन समर्पित करणा-या वीर सैनिकांना ख-या अर्थानी श्रद्धांजली देतो.
भारतीय सैनिकांच्या शौर्याचा आवाका (कॅनव्हास) पारंपारिक युद्धक्षेत्रांच्या पलीकडे; दुर्गम सीमा रक्षण करणाऱ्या फॉर्मेशन्स/सैनिकांची सामरिक लवचिकता (ऑपरेशनल फ्लेक्सिबिलिटी ऑफ ट्रूप्स), प्रखर आपत्तीशी झुंजणाऱ्या आपत्ती निवारण पथकांचा जलद प्रतिसाद (क्विक डिझासटर रिसपॉन्स) आणि संघर्षग्रस्त क्षेत्रात सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वकष समर्पणापर्यंत (डेडिकेशन टू ड्युटी) पसरला आहे.कारगिल युद्ध कल्लोळात “ये दिल मांगे मोर!” म्हणणारा कॅप्टन विक्रम बत्रा असो; १८,००० फुटांवरील कठीण, धोकादायक युद्ध क्षेत्रातील हिम वादळाचा सामना करतांना,मानवी सहनशक्ती पलीकडे जात,सियाचीनमधील दुर्गम चौक्यांच रक्षण करणारे सैनिक असो;तात्पुरत्या ऑपरेशन थिएटरमधे जखमी सैनिकांवर उपचार करतांना शत्रूच्या गोळीबाराचा सामना करणारी “कारगिलची नाइटिंगेल”, मेजर शकुंतला देवी असो, किंवा,प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत, एकट्यानी ७२तास नेफामधील चौकीच रक्षण करणारा गढवाल रायफल्सचा हवालदार जसवंतसिंग रावत असो; या सर्वांनी; बर्फाच्छादित शिखर ते विशाल,तप्त वाळवंटापर्यंत सगळीकडील, अकल्पनीय आव्हानांना तोंड दिल आहे. म्हणूनच; सेना दिवस किंवा आर्मी डे हा केवळ एक कार्यक्रम नसून,आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची मार्मिक आठवण असते. त्या सैनिकांच धैर्य व शौर्य आपल्याला; लवचिकता (फ्लेक्सिबिलिटी), एकता (युनिटी) आणि राष्ट्रसेवेला (सर्व्हिस टू द नेशन) मूर्त रूप देण्याची प्रेरणा देत.

१५ जानेवारीला;जगात तिसऱ्या क्रमांकाच सक्रिय मनुष्यबळ असलेल्या सेनेतील, देशासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणाऱ्या युद्धवीरांना आदरांजली अर्पण केल्या जाते. २०२३ पर्यंत दरवर्षी, दिल्लीतील इंडिया गेटपासच्या अमर जवान ज्योतीला,सेनेतील शहीद सैनिकांच्यासाठी, श्रद्धांजली अर्पण केली जात असे. त्या नंतर दिल्लीतील करिअप्पा कवायत मैदानावर (परेड ग्राउंड); सेनेतील सर्वसमावेशक रेजिमेंटचे सैनिक,अन्य संसाधन आणि युद्धजन्य सैनिकी देखावे (बॅटल शोज्) असलेली एक भव्य दिव्य परेड आयोजित केल्या जात असे. १९५१ ला; पहिली आर्मी डे परेड आयोजित करण्यात आली होती तेंव्हापासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.करिअप्पा ग्राउंड; सेनाधिकारी, एनसीसी कॅडेट्स, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, आमंत्रित महत्वपूर्ण प्रशासकीय अधिकारी/नागरिक/राजकीय नेते आणि सर्व स्तरातील लोकांनी खचाखच भरत असे.
परेड ग्राऊंडच्या गेटमधून पायदळ सैनिकांची पहिली तुकडी (इन्फन्ट्री कंपनी), उपस्थित गणमान्यांच्या टाळ्यांच्या गजरात मैदानात दाखल होत असे.त्या नंतर; एकामागून एक, बाकी इन्फन्ट्री रेजिमेंटच्या तुकड्या येत असत. सर्वात शेवटी,लष्करी धून (मार्शल ट्यूनस् वाजवत,आर्मी बँड यायचा.सहा फूट उंच,कड्क इस्त्री केलेले गणवेश,छातीवर चमचमती पदक आणि हाती रायफल्स असलेले सैनिक आणि हातात मनाची सीधी तलवार (स्ट्रेट स्वोर्ड) असलेले त्यांचे कमांडर्स, या सर्वांना परेड ग्राऊंडमधे येतांना पाहण,स्वर्गीय अनुभव असायचा. पायदळ सैनिकांनंतर, रणगाडे व आर्मर्ड पर्सनसल कॅरियर्स येत असत. एका मागून एक येणाऱ्या या तुकड्या आत घेऊन उभ राहिल्यावर, परेड कमांडर त्यांना जागेवर उभे राहण्याची आज्ञा देत असे. त्यानी दिलेल्या,“सावधान व विश्राम”, या आज्ञेच पालन करतांना, सैनिकांनी कमरेच्या पट्ट्यापर्यंत उचलून, जमीनीवर खाडकन मारलेल्या पायांचा बुलंद आवाज,अंग मोहरवणारा व रोमांचक असे. त्या नंतर होणाऱ्या सेनाध्यक्षांच्या भाषणासाठी परेड ग्राऊंडवर नीरव शांतता निर्माण व्हायची.

सेनाध्यक्षांची अनुभवी व तीक्ष्ण नजर आणि ओघवती भाषा, सैनिकांच मनोधैर्य वृद्धिंगत करून त्यांच्यात जोश भरते. तीच भाषा व नजर,त्यांना देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी उद्युक्त करते.त्यांच्यात, सैनिकांना प्रेरित करण्याची आणि त्यांच ऐकून समजण्याची क्षमता असते.त्यांच्या भाषणातून सैनिकांना एकच संदेश मिळतो; “तू ना थकेगा कभी, तू ना रुकेगा कभी, तू ना मुडेगा कभी, कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ”.परेड ग्राऊंडवरील प्रत्येक तगडा जवान, डोळ्यात प्राण आणून
सेनाध्यक्षांच्या आगमनाची वाट पाहातो. त्यांच आगमन आणि त्यांच भाषण ऐकण, प्रत्येक सैनिकासाठी अभिमानास्पद आणि स्फूर्तीदायक असत. या पार्श्वभूमीवर, सेनादलाच घोष पथक शौर्य संगीत वाजवत असतांना (आर्मी बँड प्लेइंग मार्शल ट्यून्स),जेंव्हा कवायत पुनरावलोकन (परेड रिव्ह्यू), भाषण, पदकार्पण आणि गमन सलामीसाठी (डिपार्टिंग जनरल सॅल्युट) सलामी मंचावर सेनाध्यक्षांच आगमन होत तेंव्हा, हा अभिमानास्पद क्षण अवलोकन करणाऱ्या उपस्थित प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना उफाळते. परेड प्रमुखांनी परवानगी मागितल्यावर सेनाध्यक्ष, उघड्या जीपमधून परेडच निरीक्षण (रिव्ह्यू) करतात.त्या नंतर,सेनेतील काही निवडक अधिकारी व सैनिकांना त्यांच्या युद्धजन्य परिस्थितीतील लक्षणीय कामगिरीसाठी शौर्य पुरस्कारांनी अलंकृत केल्या जात. सेनाध्यक्ष हा पुरस्कार प्रदान करत असतांना उद्घोषक; हिंदी व इंग्रजी भाषेत,सन्मानित करण्यात आलेल्या वीरांच्या सन्मानपत्रांच रसाळ व ओघवत वाचन करतात.

या नंतर सेनाध्यक्ष परेडला संबोधित करतात.आपल्या भाषणात ते; सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांच अभिनंदन करत, देशातील लोकांच्या “उद्यासाठी आपला आज” देतांना, प्राण निछावर केलेल्या सेनेच्या शहीद वीरांना आदरांजली वाहतात. त्यानंतर; सेनाध्यक्षांच्या अनुमतीनंतर परेड कमांडरनी आपल्या जवानांना “मार्च पास्ट” सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर परेड, सेनाध्यक्षांना सलामी देण्याची कारवाई सुरू करते.सर्व रेजिमेंटचे सैनिक, त्यांच्या टाचांनी जमीन खोदत/दणाणत(डिगिंग द हील्स), ताठ हातांच्या मुठींना खांद्याच्या पातळीपर्यंत नेत, धिप्पाड छाती पुढे, डोक ताठ आणि डोळे समोर ठेवत सेनाध्यक्षांच्या सलामी मंचापर्यंत (डायस) येतात. तेथे रेजिमेंट कंपनी कमांडर खाडकन पाय आपटत सेनाध्यक्षांकडे पाहात आपली तलवार खाली आणत त्यांना सलामी देतो. उद्घोषक,रेजिमेंट व कंपनी कमांडरच नाव आणि त्यांची शौर्यगाथा सांगतो. एकामागून एक इन्फन्ट्री कंपन्या,कमंडोज्, रणगाडे आणि शेवटी घोष पथक सलामी मंचासमोरून जातात. हे होत असतांना, परेड ग्राउंड,टाळ्यांच्या गडगटांनी दुमदुमून जात.परेड आपल्या पहिल्या जागी आल्यावर,उपस्थित प्रेक्षक ज्याची आतुरतेनी वाट पाहत असतात ती, लष्करी प्रात्यक्षिक सुरू होतात.
भारतीय स्थलसेनेच्या सैनिकांच धैर्य व युद्ध कौशल्य आणि हेलिकॉप्टर्स,रणगाडे, तोफा व बंदुका आदि संसाधनांचा प्रभावी वापर दर्शवणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीची ही प्रात्यक्षिक असतात.शत्रूवर आकस्मिक हल्ला, दहशतवाद्यांचा खातमा, जखमी सैनिकांची निष्कासी, हेलीबॉर्न अटॅक,नदीवर पूल बांधणी अशा अनेक प्रात्यक्षिकांनंतर शेवटी,लढाऊ पोशाखातील मोटरसायकल्स स्वार स्त्री पुरुष सैनिक तिरंगा फडकवत आपल कर्तब दाखवतात.त्यानंतर सेना दिवस परेडची सांगता होते आणि सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहतात. हा केवढा जबरदस्त अनुभव असतो हे वर्णातीत असत.
संपूर्ण भारतातील नागरिकांना आर्मी डे बद्दल जाणकारी व्हावी,सेनेची हत्यार पाहता/हाताळता यावीत,सेना देश रक्षण कस करते याची प्रत्यक्ष कल्पना यावी आणि सैनिकांशी मुक्त संवाद साधता यावा या उद्देशानी;२०२३ पासून आर्मी कमांड असणाऱ्या निवडक मोठ्या शहरांमधे सेना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.या धोरणानुसार २०२४चा आर्मी डे, लखनौ मधे साजरा झाला.२०२५चा आर्मी डे, सदर्न कमांड,पुणे येथे साजरा होणार आहे.हा सेना दिवस, “सेलिब्रेटिंग रोल ऑफ इंडियन आर्मी बियाँड बॉर्डर्स अँड बॅटल” या घोष वाक्याला (मोटो) उजागर करेल. यासाठी सेनेनी डिसेंबर२४ अखेर, चित्रपट अभिनेता आर माधवन आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांचा सहभाग असलेला प्रमोशनल व्हिडियो जारी केला.”राष्ट्रातील सर्व लोकांनी एकत्र येऊन देश रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांचा सन्मान करूया, सलामी देऊया” अशी साद घालत,या दिवशी कोणते कार्यक्रम होतील हे यांनी व्हिडीओत सांगितल आहे.परेड पुणे स्थित, बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप अँड सेंटर,च्या विस्तीर्ण मैदानावर होईल.परेडमधे; मार्चींग काँटिंजन्टस्, मेकेनाइज्ड कॉलम्स, टेक्नॉलॉजीकल एक्झिबिटस्, कटिंग एज डिफेन्स टेक्नॉलॉजी लाईक ड्रोन्स/ रोबॉटिक्स, काँबॅट डे माँनस्ट्रेशंस आणि मार्शल आर्ट परफॉर्मन्स यांचा समावेश असणार आहे.

बुधवार,१५ जानेवारी,२५ या ७५व्या सेना दिवस निमित्तानी,आपल्या उद्यासाठी आज त्याचे प्राण अर्पण करणाऱ्या (फॉर युवर टूमॉरो, ही गेव्ह हिज टू डे), सेनेच्या शहीद वीरांना साश्रू श्रद्धांजली अर्पण करूया.जय हिंद.

 

लेखक
कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

१२/०१/२५:१६,भगवाघर कॉलनी, धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१४९८७६/abmup५४@