
जालना : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन सरकारने ओबीसी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिले आहे. सरकारने आपल्याला दिलेला हा शब्द तीन महिन्यांपासून बदललेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारवर विश्वास आहे, असे मत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे. (Maratha Reservation Issue)
जालना येथे वडागांद्रा येथील ओबीसी बचाव साखळी उपोषण आंदोलन सोडवण्यासाठी बबनराव तायवाडे उपस्थित होते. यावेळी बोलताना तायवाडे यांनी ही बाब स्पष्ट केली. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना तायवाडे म्हणाले की, ओबीसी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सरकारची २९ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. यावेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे. सोबतच, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ असे सरकारने आजपर्यंत कुठेही असे म्हटले नाही. सरकारने आपल्याला दिलेला हा शब्द तीन महिन्यांपासून बदललेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारवर विश्वास आहे, असे बबनराव तायवाडे म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो मराठ्यांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे आंतरवाली सराटी येथून पायी दिंडी काढत मुंबईकडे कूच करणार आहेत.