

भूजल पुनर्भरण आणि व्यवस्थापन बरोबरच भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर होणे हि काळाची गरज आहे. भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर तसेच भूजल पुनर्भरणाची चळवळही व्यापक प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर जनजागृती करत आहे. त्याअनुषंगाने जाणून घेऊ या, भुजल पुनर्भरण याबाबत तांत्रिक माहिती साध्या सोप्या शब्दात.
भुजल पुनर्भरण म्हणजे काय?
जमिनीच्या पोटात गाळून किंवा चाळून पाणी सोडणे म्हणजे भूजल पुनर्भरण होय. थोडक्यात काय तर जमिनीच्या पोटात आपण पाण्याचे इंजेक्शन देतोय.
भूजल पुनर्भरणच्या पारंपारिक व अपारंपारिक साध्या सोप्या कमी खर्चाच्या, कमी तांत्रिक, सहज करता येण्यासारख्या काही पद्धती अशा आहेत.
१. विहीर पुनर्भरण
पावसाळ्यामध्ये विहीरीच्या परिसरात पडलेले पाणी गाळून विहीरीत सोडणे म्हणजे विहीर फेरभरण होय. आपल्या परिसरात विहीर असल्यास विहीरीच्या वरच्या भागाला विहीरी जवळ १० X १० X ७ आकाराचा खड्डा तयार करून त्यात दगड, गोटे, खडी. वाळू भरून पाणी गाळून पी.व्ही.सी पाईपद्वारे विहीरीत सोडणे. अशा प्रकारे विहीरीत सोडलेले पाणी जमिनीतील जलपोकळीत साठून राहील व कालांतराने टंचाईच्या काळात याचा वापर करता येईल.
२. बोअरवेलचे भूजल पुनर्भरण
प्रत्येकाने आपापल्या घराच्या छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ही पध्दत उपयुक्त आहे. आपल्या छतावरील वाहून जाणारे पाणी वाहून जावू न देता पी.व्ही.सी पाईपद्वारे एकत्रित करून देवास फिल्टर द्वारे बोअरवेलमध्ये सोडणे जेणे करून पाणी फिल्टर होवून सरळ बोअरवेल मध्ये साठेल व आपणास बारमाही पाणी मिळेल.
३.पुनर्भरण खड्डा (रिचार्ज पिट)
ज्याच्याकडे जलफेरभरणासाठी विहीर किंवा विंधन विहीर नाही व जलफेरभरण करायचे आहे अशांसाठी ही पध्दत उपयोगाची आहे. आपल्या घराच्या परिसरात खोलगट भागात ३ मि. X ३ मि X ३मि. या आकाराचा खड्डा करून त्यामध्ये दगड, गोटे, विटांचे तुकडे, सिंगल वाळू भरून जमिनीवरील पाणी फिल्टर करून जमिनीमध्ये मुरवता येते.
४. वनराई बंधारे
वनराई बंधारा ही एक कमी खर्चाची जल फेरभरणाची पध्दत आहे. गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर आपल्याला वनराई बांध घालता येईल. यासाठी प्रथम नाल्यात छोटे मोठे दगड व त्यावर काही माती घालून दबाई करावी व यानंतर सिमेंटच्या किंवा खताच्या रिकाम्या बॅग मध्ये माती भरून त्यावर दोन किंवा तीन लाईनमध्ये लावावे व यानंतर पुन्हा बॅगवर माती लावावी. या बांधात साठलेले पाणी जमिनीत झिरपल्यामुळे कालांतराने पाण्याचा वापर करता येईल. कमी खर्चात जास्त फायदा देणारी ही उपाययोजना आहे.
महाराष्ट्रातील ८१ टक्के भूस्तर हा पाषाणापासून बनलेला असल्यामुळे काही ठिकाणी वरील जलफेरभरण पद्धतीचा परिणाम कमी होतो. यासाठी विंधन विहीरी विस्फोट तंत्र, फॅक्चर सील सिमेंटेशन, जलभंजन या आधुनिक तंत्राचा वापर करावा लागतो.
पाण्याचा कार्यक्षम वापर
पाणीपुरवठा योजनेतून पाणी गळती होऊन पाणी वाया जाते, त्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणात पाण्याचा पुनर्वापर करण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यादृष्टीनेही उपाययोजना होणे आवश्यक आहे.पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. जेणे करुन पाण्याची बचत होईल.पीक पद्धतीचाही विचार करून यापुढे कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पीक पद्धतीचा विचार करून, पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार, स्प्रिंकलर अशा आधुनिक पद्धतींचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होवून आर्थिक विकास होईल.
जलसाक्षरता
देशातील एकूण धरणांपैकी बहुसंख्य धरणे महाराष्ट्रात असून व आजतागायत पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवूनही आपण फक्त सतरा टक्के जमीन सिंचनाखाली आणू शकलो, यामागे महाराष्ट्राची भौगोलिक रचना हे शास्त्रीय कारण असले तरी जलफेरभरण या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होवू शकले नाही हेही यामागचे मुख्य कारण आहे.
मानसिकता बदलाची गरज
पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचा कितीही वापर केला तरी चालतो ही मानसिकता आजतागायत आपल्या मनात घर करून बसली आहे. परंतु प्रत्यक्षात पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिच्यावर सर्वांचा समान हक्क आहे. ही मानसिकता सर्व सामान्य जनतेच्या मनात रूजवावी लागेल. यासाठी आपल्याला खालील विषयावर जलसाक्षरता करण्याची आवश्यकता आहे. किमान आवश्यक जाणीव जागृती असणे ही मूलभूत संकल्पना साक्षरता शब्दाच्या पाठीशी आहे.
१. एकूण पाणी किती उपलब्ध आहे. निसर्ग हे आपल्याला कधी, केव्हा, कुठे, किती देतो हे आपल्या हातात नसून त्याचे संवर्धन करणे आपल्या हातात आहे हे जनतेला सांगावे लागेल.
२. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात पाणी याविषयावर माहिती दिली जावी.
३. महाराष्ट्रात पाणी या विषयावर अनेक स्वयंसेवी संस्थांनी यशस्वीपणे काम केले आहे ते जनतेपर्यंत पोहचले पाहिजे.
४. हवामान खात्याचा अंदाजाचा व पर्जन्यमापक यंत्राचा योग्य वापर करण्यासाठी कृषी खात्यामार्फत स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा उभी करावी लागेल.
५. उपलब्ध पाणी, भूजल, पाण्याचा कार्यक्षम वापर, सिंचन, पुनर्भरण, पुनर्वापर, पाणलोट क्षेत्र विकास, पर्यावरण, दूषित पाणी याबाबतची सखोल माहिती विविध प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहचावी लागेल.
६. यापूर्वी झालेल्या पाणलोट कामातील साठलेला गाळ काढणे व देखभाल दुरूस्तीची कामे लोकसहभागातून करणे.
पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे प्रत्येकाने जलफेरभरणाद्वारे नियोजन केल्यास तीव्र पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शक्य आहे.
७. दोन हजार चौरसफुट क्षेत्रफळ असलेल्या घराचे जलफेरभरण केल्यास सरासरी सहाशे पन्नास मि.मी. पर्जन्यमानाप्रमाणे एक लाख वीस हजार लिटर पाणी संकलित होते. प्रतिदिन पाचशे लिटर प्रमाणे उपयोगात आणल्यास ते आठमाही पुरते.
लेखकः डॉ.कैलास आहेर, कनिष्ठ भुवैज्ञानिक, छत्रपती संभाजीनगर.(Author: Dr. Kailas Aher, Junior Geologist, Chhatrapati Sambhajinagar.)
संकलनःजिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.