


विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनद्वारे ‘तणाव व्यवस्थापन’ वर व्याख्यान
नागपूर(Nagpur) २४ जून :- ताण-तणाव हा आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनला आहे, परंतु सोप्या योग तंत्राद्वारे त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते, असे प्रतिपादन नागपूरचे माजी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार(Dr. Bhushan Kumar) उपाध्याय (आयपीएस)यांनी केले.
विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (व्हीएमए ) तर्फे चिटणविस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित ‘कामाच्या ठिकाणी तणाव व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
अलीकडे आपला मेंदू वारंवार तणाव अनुभवतो, यातील 80% तणाव आपल्या मनातूनच उद्भवत असतो. बॉसकडून कर्मचाऱ्यांपर्यंत ताण पोहोचतो, पुढे कर्मचारी हाच ताण त्यांच्या कुटुंबियांना देतात, हे कुटुंबीय त्यांना भेटणाऱ्या लोकांना ताण देतात आणि असे चक्र निर्माण होते. तणाव दडपला तर तो पुन्हा येईल. त्यामुळे तणाव पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी त्याला वेळीच हाताळण्याचा आणि चॅनेलाइज करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
त्यांनी दैनंदिन मानसिक स्वच्छतेच्या गरजेवरदेखील भर दिला. २४ तासात एकदा आपले मन स्वच्छ केल्यास तणावमुक्त राहता येऊ शकते असे ते म्हणाले. अल्प-मुदतीचा ताण आटोक्यात आणता येतो हे मान्य करतानाच, दीर्घकालीन आणि वारंवार ताणतणावाच्या हानिकारक परिणामांबाबत त्यांनी इशारा दिला. दीर्घकाळापर्यंत ताण मज्जासंस्थेला सक्रिय करते आणि एड्रेनालाईन हार्मोन स्रावित करते, ज्यामुळे स्नायू, हृदय आणि हाडांना हानी पोहोचते. तणाव नियंत्रित करण्यासाठी सूर्य नाडी (उजवी नाकपुडी) आणि चंद्र नाडी (डावी नाकपुडी) यांसारखी विशिष्ट श्वासोच्छवासाची तंत्रे देखील त्यांनी सुचविली. या सत्राचे संचालन तुषार पत्राळे यांनी केले, तर करुण सिंघानिया हे सत्र प्रभारी होते.