
खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरच्यावतीने मागील तीन वर्षांपासून शहरात ‘सांस्कृतिक’ गणेशोत्सव साजरा केला जातो. शहराच्या विविध भागातील गणेश मंडळे समितीच्या मदतीने धुमधडाक्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता असतात.
यावर्षी देखील नागपूरकरांना अशी सांस्कृतिक मेजवानी मिळणार असून स्थानिक गणेश मंडळांनी गणेशात्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरच्यावतीने करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून, कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा व गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांनी कला, साहित्याशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो.
यावर्षी नाट्य संगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तिगीत, अभंग, देशभक्तीपर गीत, गीतरामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपरिक खेळ, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन (हिंदी व मराठी), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदवावी. तसेच, कला संस्थानी आपल्या कार्यक्रमांची 5 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
नोंदणी करीता व अधिक माहितीकरिता श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल समोर, खामला चौक, नागपूर येथे 22 जुलै पासून सकाळी 12 ते 3 या वेळेत संपर्क साधावा.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील,मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
















