‘या’ सहा जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा, राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

0

महाराष्ट्रात पावसाचे संकट आणखी तीन दिवस असणार आहे. सोमवारी सहा जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पावसामुळे बोअरवेलमधून पाणी बाहेर येत आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील तीन दिवसांत ही राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील पावसाच्या संकटामुळे २७,२८ व २९ मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

मुंबईत डबेवाल्यांची सेवा विस्कळीत
राज्यात हवामान विभागाने सहा जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला आहे. सोमवारी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या बहुतांश भागात पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार
पुणे जिल्हा: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे बोअरवेलमधून पाणी येऊ लागले आहे. काही शेतकऱ्यांच्या बोरवेलमधून बाहेर पाणी येत आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात दिसणाऱ्या पावसाच्या पाण्याची परिस्थिती मे महिन्यातच दिसू लागली.

सांगली: जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. सांगली शहरातील आयर्विन पूलाची पाण्याची पातळी आता 16 फुटांवर पोहचलेली आहे. सकाळपासून या पाण्याच्या पातळीमध्ये एक फुटाने वाढ होत आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे.

सातारा: फलटण येथे रविवारी 161 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. फलटण येथील बाणगंगा नदी पातळीत अचानक वाढ झाली. यामुळे शुक्रवार पेठ शनिनगर परिसरात शंभरहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे या भागात संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. नदीचे पाणी वस्तीमध्ये घुसल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या भागात घरामध्ये चिखल झालेला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून अग्निशामक दलाच्या गाडीतून पाण्याने परिसराची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे.

भीमाशंकर: परिसरात पावसाने कहर केला आहे. घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूसह धान्य भिजले आहे. पावसामुळे शेतीचे आणि पशुधनाचे ही मोठे नुकसान झाले आहे. भिमाशंकर आणि भोरगिरी परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. डोंगरकड्यांवरून येणारे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने भातासाठी तयार केलेली भात खाचर पूर्णपणे नष्ट झाले आहे.