

पुणे (Pune), 24 नोव्हेंबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता आणि प्रभारी कुलसचिव पदभरतीशी निगडीत अनेक प्रश्न काही अधिसभा सदस्यांकडून येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेच्या उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.परंतु, विद्यापीठाकडून पुढील आठवड्यात पूर्णवेळ रिक्त असलेल्या चार अधिष्ठातापदाच्या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, कुलसचिव पदभरती आणखी काही दिवस लांबणार आहे. त्यामुळे पूर्णवेळ कुलसचिव कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर पूर्णवेळ अधिष्ठाता यांचाही कार्यकाळ संपला. मात्र, त्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. कारभारी काळे यांनी प्रभारी अधिष्ठाता पदावर चार व्यक्तींची नियुक्ती केली. पुढे डॉ. सुरेश गोसावी यांनी पूर्णवेळ कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारली.
गोसावी यांच्या कार्यकाळात अधिष्ठाता भरतीची जाहिरात देण्यात आली होती. तसेच पात्र उमेदवारांकडून अर्जही स्वीकारण्यात आले. परंतु, या भरतीसाठी राज्य शासनाकडून आरक्षणाचा नियम लागू करण्यात आला. परिणामी संबंधित जाहिरात रद्द करण्यात आली.आता खुला संवर्ग, ओबीसी संवर्ग, एससी संवर्ग आणि एनटी संवर्गातील उमेदवारांमधून अधिष्ठाता पदाची निवड केली जाणार आहे.