
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मात्र, त्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ रहावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे पटेलांनी यावेळी सांगितले.
आजच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांच्या आंदोलनात शरद पवार समर्थक आमदार सहभागी नव्हते. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोर आमदार पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले. त्यावेळी ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी होते. ते नंतर सेंटरवर पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याचे त्यांनी सांगितले. या नेत्यांनी त्यांच्याकडे भाजपसोबत येण्याचा आग्रह धरला. पण पवारांनी त्यांच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, अजित पवार गटाच्या नेत्यांनी ही बैठक आटोपती घेतली.