

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान प्राप्त होऊ न शकलेल्या वरिष्ठ नेत्यांपैकी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आगामी काळात भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे येतील अशी दाट शक्यता भाजपा वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद प्राप्त झाले असल्याने येत्या काळात भाजपाच्या संघटन रचनेत प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होणार हे स्पष्ट आहे. त्यात गिरीश महाजन यांच्याकडे हे पद येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने ते नावही आता या स्पर्धेतून बाद झाले आहे.
सद्यस्थितीत मराठा विषयाबाबत समतोल साधण्यासाठी आ. रवींद्र चव्हाण यांचे नाव योग्य ठरेल, अशा भूमिकेतून त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नसल्याचे सांगितले जाते आहे. मध्यंतरी त्यांना दिल्लीतून आलेले तातडीचे बोलावणे, याच कारणासाठी होते, असेही म्हटले जाते.
२००२ साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्षपदावर नेमणूक झाली. २००५ साली नगरसेवक म्हणून निवडून आले. २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद मिळाले. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान मिळाला. २०१४ व त्यानंतर २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, २०१६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या ४ खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी, २०२० साली भारतीय जनता पार्टीने फार मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक केली. २०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण खाती होती.